Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Goa ›

साखळी पालिका दर्जा  बदलासंबंधी याचिका फेटाळली

साखळी पालिका दर्जा  बदलासंबंधी याचिका फेटाळली

Published On: Apr 05 2018 2:27AM | Last Updated: Apr 05 2018 2:12AMपणजी : प्रतिनिधी

साखळी नगरपालिकेचा दर्जा  सी वरून बी असा बदलून  प्रभागांची संख्या वाढवल्याच्या विरोधात नगराध्यक्ष  धर्मेश  सगलानी यांनी  दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी फेटाळून  लावली. त्यामुळे साखळी पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.  साखळी नगरपालिका  निवडणूक  जाहीर करण्यात आली आहे.  29 एप्रिल रोजी  साखळीबरोबरच   फोंडा  पालिकेची  निवडणूक  होणार आहे.   सरकारने  साखळी नगरपालिकेचा दर्जा ‘सी’ वरून ‘बी’ असा बदलून प्रभागांची संख्या 11 वरून 13 केली आहे. सरकारच्या या निर्णयाला सगलानी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

साखळी नगरपालिकेची एकूण लोकसंख्या पाहता  तिचा दर्जा ‘सी’वरून ‘बी’ दिला जाऊ शकत नाही.  तसेच प्रभागांच्या संख्येतही बदल केला जाऊ शकत नसल्याचे  सगलानी यांनी आपल्या याचिकेत नमूद केले  होते.   या याचिकेच्या पार्श्‍वभूमीवर  न्यायालयाने सरकारला  नगरपालिकेच्या प्रभागांची संख्या कुठल्या आधारे वाढवण्यात आली.  त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास  सांगितले होते.  सरकारने  हे प्रतिज्ञापत्र सादर करून   न्यायालयात   युक्‍तीवाद करताना म्हटले की,  साखळी पालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याबाबतचा आदेश डिसेंबर महिन्यात जारी करण्यात  आला  होता. 

सगलानी यांनी तेव्हाच त्याला आव्हान देणे अपेक्षित होते.  मात्र आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने याचिका मान्य करुन घेतल्यास ही प्रक्रिया स्थगित होईल. बुधवारी झालेल्या  सुनावणीवेळी   न्यायालयाने निवडणूक प्रक्रीया सुरु झाल्याने व ही याचिका   दाखल करण्यास सगलानी यांनी विलंब केल्याने   त्यांची ही याचिका   मान्य केली जाऊ शकत  नसल्याचे सांगून फेटाळली.