Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Goa › अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसांचे

अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसांचे

Published On: Feb 19 2018 1:38AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर  पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजाचे दिवस कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.    विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची विशेष बैठक  सोमवारी (आज)सकाळी बोलावण्यात आली आहे. अर्थसंकल्प मंजुरीनंतर तीन दिवसातच अधिवेशनाचे कामकाज संपवावे, असा प्रस्ताव असून याबाबतचा निर्णय  बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती उपसभापती तथा कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी दिली. 
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अर्थसंकल्पीय  अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

पर्रीकर यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार सुरू असल्याने मुंबईतील लीलावती इस्पितळातून त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळू शकला नाही.  त्यामुळे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभा कामकाजाचे दिवस कमी करण्याची मागणी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्यकडे केली आहे. लोबो यांनी सांगितले की, केवळ सभापतींकडेच नव्हे तर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्याशीही आपण याबाबत चर्चा केली आहे.

कामकाज सल्लागार समितीची विशेष बैठक सोमवारी सकाळी घेतली जाणार असून सर्वानुमते सदर निर्णय घेतला जाणार आहे. खासदार सावईकर तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, संजीव देसाई, दत्ता खोलकर आदी नेत्यांनी रविवारी लीलावती इस्पितळास भेट दिली. परंतु उपचार  सुरू असल्याने त्यांना पर्रीकरांची प्रत्यक्ष भेट मिळू शकली नाही. सध्या त्यांना कोणालाही भेटू दिले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 


अर्थसंकल्प ढवळीकर मांडणार 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांनी जर अर्थसंकल्प मांडला नाही तर तो विधानसभेच्या पटलावर ठेवता येतो. तो वाचूनच दाखवला पाहिजे असे नाही. अथवा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर दुसरा एखादा मंत्री अर्थसंकल्पाचे वाचन  विधानसभेत करू शकतो. मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री सुदिन ढवळीकर असून ते अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजप विधिमंडळ गटाचीही आज बैठक 

 भाजप आमदारांची तातडीची बैठक सोमवारी  सकाळी 10.30 वाजता बोलावण्यात आली असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी तसेच विधानसभेच्या कामकामाचे दिवस कमी करण्यासंबंधीची माहिती त्यांना देण्यात येईल. अधिवेशन लवकर गुंडाळण्यास काँग्रेसची तयारी : कवळेकर   विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. सभापतींनी फोनवरून आपल्याला बैठकीची कल्पना दिली असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामकाजात काही फेरबदल करायचे असतील तर माणुसकीच्या दृष्टीने ते आम्ही स्वीकारू. मुख्यमंत्र्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते पूर्वीप्रमाणे रुजू व्हावेत,यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत.