Tue, Aug 20, 2019 05:04होमपेज › Goa › ब्रेन डेड व्यक्‍तीच्या अवयवांचे मुंंबईतील रुग्णांना प्रत्यारोपण

ब्रेन डेड व्यक्‍तीच्या अवयवांचे मुंंबईतील रुग्णांना प्रत्यारोपण

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 11:17PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील एका ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाच्या शरीरातील मरणोत्तर दान केलेले महत्त्वाचे अवयव जलदरित्या मुंबईला नेण्यासाठी दोनापावला ते दाबोळी विमानतळापर्यंतचा मार्ग शुक्रवारी ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवण्यात आला. राज्याच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच  अवयव रोपण करण्यासाठी खास  ‘ग्रीन कॉरिडॉर’   बनवण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पडला. दोनापावला येथील एका खासगी इस्पितळातील एका  ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी केलेल्या माणूसकीच्या या कृतीमुळे दोघा गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाचा लाभ मिळाला आहे.     

या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे यकृत आणि मूत्रपिंड काढून मुंबईला जलदरित्या पाठवण्यात आले. यासाठी दोनापावला ते दाबोळी विमानतळापर्यंतचा पूर्ण मार्ग ‘ग्रीन कॉरीडॉर’ बनवण्यात आला. राज्य पोलिस दलातर्फे या मार्गावर काही काळ सर्व वाहतूक रोखून अवयव सुरक्षितरित्या दाबोळी विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर चार्टर फ्लाईटद्वारे सदर अवयव मुंबईला पोचून तातडीने शुक्रवारीच अवयव प्रत्यारोपण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. शेखर साळकर म्हणाले की, गोव्यातील एका ‘बीएसआर’ (नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) कुटुंबीयांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे सर्व अवयव दान करण्यात आले. सदर रुग्णाचे  शुक्रवारी सकाळी 11 वाजता निधन झाल्यावर  त्याचे यकृत आणि मूत्रपिंड काढून मुंबईला गरजू रुग्णांसाठी पाठवण्यात आले. राज्यातील पहिल्याच आंतरराज्य अवयव प्रत्यारोपणासाठी ‘रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायजेशन’च्या मुंबई आणि गोवा राज्य शाखेच्या खास अधिकार्‍यांनी तयारी केली होती. अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे हे आंतरराज्य अवयव प्रत्यारोपण शक्य झाल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले. 
 

 

tags : Panaji,news,Brain, Dead, body,parts, Mumbai, patients, transplant,