Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Goa › बाबू कवळेकर यांची एसीबीकडून चौकशी

बाबू कवळेकर यांची एसीबीकडून चौकशी

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 10 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांची भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी)  शुक्रवारी तीन तास कसून चौकशी केली. आल्तिनो येथील एसीबीच्या कार्यालयात कवळेकर हजर झाले.  आपल्या विरोधातील सर्व आरोप खोटे  आहेत. मात्र, तपास यंत्रणेला आपण  चौकशीत नेहमीच सहकार्य करणार, असे  कवळेकर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

कवळेकर व त्यांची पत्नी सावित्री  कवळेकर यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सप्टेंबर 2017 मध्ये एफआयआर नोंद करण्यात आला होता. कवळेकर यांना 5 रोजी चौकशीसाठी एसीबीने  पहिले  समन्स बजावून  हजर राहण्यास सांगितले होते.  परंतु, आगामी अर्थसंकल्पाच्या  कामात व्यग्र असल्याने येऊ शकत नसल्याचे कारण देत ते चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. गुरुवारी   कवळेकर यांनी मडगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता त्यांना    न्यायालयाने  अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजूर केला होता. त्यानंतर एसीबीने त्यांना  दुसर्‍यांदा समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते.

एसीबीच्या अधीक्षक प्रियंका कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली ही  चौकशी करण्यात आली. उत्पन्न व खरेदी केलेल्या मालमत्तेत आढळून  आलेली तफावत, मुंबई येथील ज्या  खासगी  कंपन्यांकडून असुरक्षित कर्ज घेतल्याचे सांगण्यात येत आहे त्या कंपन्या तपासात बनावट असल्याचे आढळून  आले, याबद्दल  कवळेकर  यांना चौकशी दरम्यान प्रश्‍न विचारण्यात आले. गरज पडल्यास कवळेकर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे एसीबीच्या सूत्रांनी  सांगितले.