Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Goa › कर्नाटकसह चार राज्यांतही फुलणार कमळ 

कर्नाटकसह चार राज्यांतही फुलणार कमळ 

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 05 2018 12:31AMपणजी : प्रतिनिधी

भाजपाने मागील 4 वर्षात देदीप्यमान असे यश मिळवले आहे. देशातील  29 पैकी 21 राज्यांत आज भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. येणार्‍या काळात केरळ, मिझोराम, पाँडिचेरी,पंजाब व कर्नाटक राज्यांतही कमळ फुलणार असल्याचा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला. येथील भाजपा कार्यालयात तेंडुलकर आणि सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषद घेतले. त्यावेळी तेंडुलकर म्हणाले, की गुजरात, हिमाचल या राज्यातील यशानंतर नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या निवडणुकीतही भाजपाला चांगले यश लाभले आहे. त्रिपुरात 2013 साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या फक्त एकाच उमेदवाराला अनामत रक्कम राखता आली होती आणि फक्त 1.3 टक्के मते मिळाली होती.

आता तेथे भाजपचा मतांचा आकडा 48 टक्क्यांवर पोचला आहे. तसेच एकूण 59 पैकी 35 जागा भाजपाला जिंकता आल्या असून मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ , भाजपाने मागील पाच वर्षात शुन्यातून  देदीप्यमान असे यश त्रिपुरात मिळवले आहे. त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, पत्रकारांना सत्य लिहिल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती. तरीही तेथील दडपशाहीला भाजप कार्यकर्ते पुरून उरले असून त्यांच्या अथक प्रयत्नामुळे भाजप विजयी झाला आहे.  या विजयाची पुनरावृती येणार्‍या निवडणुकीत पश्‍चिम बंगाल, केरळ आणि कर्नाटक राज्यांतही होणार आहे. नागालँडमध्ये भाजपचा एकच आमदार निवडून आला असून मताचा वाटा फक्त 3 टक्के होता.

आता रालोआ सरकारचे 40 जागा मिळाल्या असून    भाजपला 11 तर मतांचा वाटा 15.5 टक्के झाला.  तेथे अल्पसंख्याकांचे बहूमत असूनही भाजपला 11 आमदार निवडून आले आहेत.मेघालयातही भाजप आपल्या सहकारी मित्रपक्षाच्या आमदारांसोबत सत्ता स्थापन करण्याच्या वाटेवर आहे. देशात 29 राज्यापैकी भाजप आणि मित्रपक्षांचे मिळून 21 राज्यात सत्ता आहे. केरळ, मिझोराम, पॉडिंचेरी, पंजाब व कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकार असून कर्नाटकातील जनता काँग्रेसचे सरकार  घालवण्याच्या मार्गावर असल्याचे तेंडूलकर यांनी नमूद केले.  


भाजपच म्हादईप्रश्‍न सोडवू शकतो  : तेंडुलकर

अमित शहा यांनी  म्हादईचा प्रश्‍न सोडवणार असल्याचे जाहीर केले होते. म्हादईचा प्रश्‍न जलतंटा लवादाकडे प्रलंबित असून त्या निवाड्याकडे आमचे लक्ष आहे. कर्नाटकात भाजप सरकार आल्यानंतर भाजपच चर्चेद्वारे यावर तोडगा काढू  शकतो , असा शहा यांनी केलेल्या विधानाचा अर्थ आहे. मात्र शहा यांनी गोव्यावर अन्याय करणार, असे म्हटलेले नाही.  भाजपचे सरकार आल्यावर तो प्रश्‍न लवकर सुटू शकतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.