Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Goa › पुरस्कार ही कलाकारांच्या कार्याची पावती

पुरस्कार ही कलाकारांच्या कार्याची पावती

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:04AMपणजी : प्रतिनिधी

कलेच्या क्षेत्रात अपयशाला सामोरे जाऊन देखील अथक परिश्रमाने कलेची साधना करणार्‍या कलाकारांचा मान हा ‘गोवा राज्य पुरस्कारात’ आहे. हा पुरस्कार म्हणजे कलाकारांच्या कार्याची पावती असून त्यांच्या जिद्दीसाठीचा हा पुरस्कार आहे. गोवा राज्य पुरस्कार म्हणजे कलाकारांबरोबर गोवा शासनाचा गौरव आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.  कला व संस्कृती संचालनालयातर्फे  कला अकादमीत आयोजित  ‘गोवा राज्य पुरस्कार 2016 -17’ प्रदान सोहळ्यात मंत्री गावडे बोलत होते. सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट  अभिनेते सचिन खेडेकर, पद्मश्री प्रसाद सावकार, संचालक गुरूदास पिळर्णकर, ग्रंथपाल कार्लोस फर्नांडिस व्यासपीठावर उपस्थित होते.

सोहळ्यात एकूण बारा कलाकारांना मान्यवरांना हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘गोवा राज्य पुरस्कार 2016 -17’ च्या पुरस्कार्थीमध्ये प्रमोद प्रियोळकर (संगीत), एफ. जी. अल्वारो परेरा (संगीत), दासू शिरोडकर (साहित्य), गजानन जोग (साहित्य), अवेक्‍लितो अफोन्सेा (साहित्य), गणेश मराठे (नाटक), मारिया फर्नांडिस(तियात्र), रोमाल्डो डिसोझा (तियात्र), सदाशिव परब (चित्रकला), उदयबुवा फडते (कीर्तन), उमेश तारी (भजन) व राम माउसकर (लोककला) यांचा समावेश आहे. पुष्पगुच्छ, 1 लाख रुपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक संस्थेचा पुरस्कार फोंड्यातील अंत्रुज लळीत या संस्थेला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल 2015-16 चा पुरस्कार सदानंद शिरगावकर यांना तर सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल 2016-17 चा पुरस्कार मोहनदास नाईक यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमोद प्रियोळकर व अवेक्‍लितो अफोन्सेा यांनी पुरस्कार्थ्यांच्यावतीने विचार व्यक्त केले. प्रसाद सावकार म्हणाले, विद्या व कलेत फार मोठा फरक आहे. विद्या शिकून घ्यावी लागते तर कला ही माणसातच असते. विद्या आपल्याला शिकवते तर कला अंगी बाळगावी लागते. त्यामुळे कला प्रत्येकवेळी विद्येपेक्षा मोठीच ठरते.