Thu, May 23, 2019 05:16होमपेज › Goa › अ‍ॅटर्नी जनरलशी चर्चेनंतर खाणप्रश्‍नी तोडग्याचा प्रस्ताव

अ‍ॅटर्नी जनरलशी चर्चेनंतर खाणप्रश्‍नी तोडग्याचा प्रस्ताव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील खाण व्यवसाय पूर्ववत  सुरू व्हावा याबाबत केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. खाणबंदीची समस्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल आणि अन्य संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली जाणार असून त्यानंतर खाणबंदीप्रश्‍नी तोडग्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.  खाणबंदीच्या पार्श्‍वभूमीवर, 20 मार्च रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात येऊन सर्व खाण व्यावसायिक तसेच अवलंबित घटकांशी चर्चा केली असून अनेक  सूचनाही दिल्या आहेत. राज्य सरकारकडून पुढील आठवड्यात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. वेणूगोपाल तसेच अन्य वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा करून व त्यांचे मत जाणून घेऊन एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. यानंतर खाणी पुन्हा सुरू करण्याबाबत तोडगा काढण्यात यश येईल, असे सावईकर यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. आपण त्यांच्याशी शुक्रवारी दूरध्वनीवरून संभाषण केले असून लवकरच ते राज्यात येणार आहेत. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत राज्याचा प्रशासकीय कारभार तात्पुरत्या कालावधीसाठी त्रिमंत्री समितीकडे सपूर्द करण्यात आला असून ही यंत्रणा यशस्वीपणे कार्य करत असल्याचे सावईकर म्हणाले.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  मागील सुमारे चार वर्षात पक्षाचे काम जनतेपर्यंत नेण्यासाठी खास कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमानुसार पुढील दीड महिन्यातील विविध दिवस खास दिन म्हणून पाळले जाणार आहेत. एप्रिल महिन्याच्या 14  रोजी सामाजिक न्याय दिन, 18 रोजी स्वच्छ भारत दिन, 20 रोजी उज्वला दिन, 24 रोजी पंचायत राज दिन, 30 रोजी स्वस्थ भारत दिन तसेच मे महिन्याच्या 2 रोजी किसान कल्याण दिन, 5 मे रोजी कौशल्य भारत दिन साजरे केले जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या अनेक योजना जनतेपर्यंत पोचवल्या जाणार आहेत. 
 


  •