Mon, Apr 22, 2019 16:09होमपेज › Goa › पुतळ्यांसंबंधी प्रस्ताव कामकाजात नाही

पुतळ्यांसंबंधी प्रस्ताव कामकाजात नाही

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:16AMपणजी : प्रतिनिधी

पर्वरी येथील विधानसभा संकुलात पुतळे उभारण्याबाबत आलेले पाच खासगी ठरावांचे प्रस्ताव विधानसभा कामकाजात सामील  न करण्याचा निर्णय सभापती डॉ. प्रमोद सावंत घेतला आहे. पुतळ्यांसंदर्भात प्रस्ताव विधानसभेत मतदानाला गेल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता असल्याने सभापती  सावंत यांनी सर्व संबंधित ठराव बाजूला ठेवले असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्‍वेरा, स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा, डॉ. राममनोहर लोहिया, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्याबाबत आलेल्या विविध ठरावांवर सभापती प्रमोद सावंत यांनी सोमवारी निर्णय घेतला आहे.

गोव्यातील राजकीय क्षेत्र सध्या पुतळ्यांच्या विषयावरून बरेच तापले आहे. त्यामुळे ठराव चर्चेस येण्याअगोदरच ते फेटाळले जाण्याची शक्यता अनेकांनी व्यक्‍त केली होती. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदी राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांतर्फे खासगी ठरावाचे प्रस्ताव विधानसभा सभापतींकडे पाठवले आहेत. त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सभापतींना आहे. या खासगी ठरावांना मान्यता द्यावी की नाही, याचा अधिकार सभापतींना आहे. या ठरावामुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सभापती सावंत यांनी हे सर्व ठराव बाजूला ठेवले असून त्यावर आपले मत सभापती सावंत आगामी अधिवेशनात व्यक्‍त करणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले. 

विधानसभा संकुलात जॅक सिक्‍वेरा यांचा पुतळा उभारावा, यासाठी भाजपचे कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो, काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आणि राष्ट्रवादीच्या चर्चिल आलेमाव यांनी खासगी ठराव मांडण्याचे प्रस्ताव गेल्या आठवड्यात सभापतींकडे पाठवले होते. सरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगो पक्षातर्फे आमदार दीपक पाऊसकर यांनी  टी. बी. कुन्हा आणि डॉ. राममनोहर लोहिया यांचा पुतळा उभारावा, यासाठी खासगी  प्रस्ताव दिला आहे. भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, यासाठी खासगी प्रस्ताव आणला आहे. मगो आणि राजेश पाटणेकर यांनी आणलेल्या दोन वेगवेगळ्या ठरावांमुळे पुतळ्यांच्या मागणीतील गुंतागुंत आणखी वाढली आहे.