Sat, Aug 24, 2019 22:07होमपेज › Goa › आधार जोडणीकडे 35 टक्के  शिधापत्रिकाधारकांची पाठ

आधार जोडणीकडे 35 टक्के  शिधापत्रिकाधारकांची पाठ

Published On: Feb 12 2018 2:22AM | Last Updated: Feb 12 2018 2:21AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सुमारे 3 लाख 30 हजार शिधापत्रिकाधारकांपैकी 2 लाख 14 हजार 550, म्हणजे 65 टक्के लोकांनी आधारची शिधापत्रिकेशी जोडणी केली आहे. तर उर्वरित सुमारे  35 टक्के शिधापत्रिकाधारकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याची माहिती नागरी पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिली आहे . रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्यासाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान यापुढे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना केंद्र सरकारने नुकतीच लागू केली आहे. शिधापत्रिकाधारकांना धान्यावर सवलत देण्याऐवजी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’  (डीबीटीएफ)अर्थात सवलतीची रक्कम थेट खात्यात जमा करण्याची ही नवी योजना आहे.

मात्र,  सध्या कार्यरत असलेली  स्वस्त दरातील धान्य वितरण पद्धत की बँक खात्यात सबसिडी जमा करायची याबाबतचा निर्णय देशातील प्रत्येक राज्यांना स्वतंत्रपणे घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. राज्य सरकारने सदर निर्णय शिधापत्रिकाधारकांनीच घेण्याचा पर्याय उपलब्ध केला असून तसे खात्याला अर्ज सादर करून कळवण्यास सांगितले आहे. 
यासंबंधी खात्याच्या अधिकार्‍यांनी अधिक माहिती दिली आहे की, राज्यातील शिधापत्रिकांना आधार कार्ड जोडण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना 31 जानेवारी-2018पर्यंत मुदत देण्यात आली होती.  

गैरव्यवहार रोखण्यासाठी सीसीटीव्ही : गावडे

नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील धान्य चोरी तसेच अन्य गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व अकराही गोदामांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविली जाणार आहे. याशिवाय,  कुठ्ठाळी येथील मुख्य गोदामांसह अन्य चार महत्त्वाच्या गोदामांच्या दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी   सांगितले.