पणजी : प्रतिनिधी
लाचखोरीप्रकरणी पणजीच्या विशेष न्यायालयाने गोवा पोलिस खात्याचे माजी पोलिस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात एफआयआर नोंद करण्याचे आदेश भ्रष्टाचार विरोधी पथकाला सोमवारी (दि. 8) दिले. वास्को येथील व्यावसायिक मुन्नालाल हलवाई यांनी पणजी विशेष न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ऑगस्ट 2016 सालचे हे लाचखोरीचे प्रकरण आहे. एका प्रकरणात गुन्हा नोंद करण्यासाठी तत्कालीन पोलिस महानिरीक्षक गर्ग यांनी आपल्याकडून 5.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप हलवाई यांनी केला आहे.
पोलिसांकडून गर्ग विरोधात एफआयआर नोंद करण्यात न आल्याने हलवाई यांनी सप्टेंबर 2016 रोजी न्यायालयात धाव घेऊन गर्ग यांच्याविरोधात लाचप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाला एफआयआर नोंद करण्याचे निर्देेश देण्याची मागणी केली होती. दरम्यान, हलवाई म्हणाले, की न्यायालयाने गर्गविरोधात एफआयआर नोंद करण्याचे आदेश दिल्याने भ्रष्टाचाराविरोधातील पहिली लढाई आपण जिंकलो आहे. मात्र, सदर एफआयआरचा तपास हा उपधीक्षक सुचेता देसाई यांच्याकडे सोपवू नये, कारण एका प्रकरणात त्यांची दक्षता खात्याकडून चौकशी करण्यात आली होती.