होमपेज › Goa › पर्यटन हंगामात ‘पद्मावत’चे प्रदर्शन नको 

पर्यटन हंगामात ‘पद्मावत’चे प्रदर्शन नको 

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:26PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्यात  पर्यटन हंगाम सुरू असून  पोलिस  पर्यटकांच्या  सुरक्षेत  व्यग्र असल्याने   याकाळात  गोव्यात  पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन टाळावे, अशा आशयाचे पत्र गोवा पोलिसांनी  सरकारला पाठवले आहे.
गोवा पोलिसांकडून हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना पाठविण्यात आले आहे.  पद्मावत  चित्रपट  25 रोजी  सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  यापूर्वी पद्मावती  नाव असलेला हा चित्रपट 1 डिसेंबर 2017 रोजी देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र त्याला विरोध झाल्याने प्रदर्शन पुढे ढकलले तसेच त्याचे नावही बदलले आहे.

गोव्यातही काही संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर  पोलिसांनी चित्रपटाचे गोव्यात  पर्यटन हंगाम काळात प्रदर्शन टाळावे, अशी विनंती केली आहे.  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटाचे  प्रदर्शन टाळावे.   चित्रपटाला विरोध  करण्यासाठी कुणालाही संधी देऊ नये, असे पोलिसांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

सेन्सॉरसंमत असल्यास प्रदर्शनाला हरकत नाही : मुख्यमंत्री पर्रीकर 

पद्मावत या  चित्रपटाला सेन्सॉर सर्टीफिकेट मिळाले नसल्याची माहिती मिळाली असून ते सर्टिफिकेट जर त्यांच्याकडे असेल, तर राज्यात चित्रपट प्रदर्शित करण्यास हरकत नाही.  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर सरकारला यात हस्तक्षेप करावा लागेल,असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.