Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Goa › पीडीए, आराखडा विरोधात आजपासून उपोषण 

पीडीए, आराखडा विरोधात आजपासून उपोषण 

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातून पीडीए तसेच प्रादेशिक आराखडा 2021 रद्द करण्याच्या  मागणीसाठी ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’तर्फे बुधवार (दि.9) पासून रविवार (दि.13) पर्यंत सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती गोयंकार अगेन्स्ट पीडीएचे सदस्य रोशन मथाईस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मथाईस म्हणाले, काही दिवसांपूर्वी गोंयकार अगेन्स्ट पीडीए संघटनेने जाहीर सभेत राज्यातील पीडीए व प्रादेशिक आराखडा 2021 रद्द करण्याची मागणी केली होती. यावर 9 एप्रिल रोजी बैठक घेऊन मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन सरकारकडून  देण्यात आले होते. संघटनेने मागील आठवड्यात या मागण्यांचा पुनरूच्चार करून नगरनियोजनमंत्री सरदेसाई यांना मागण्या पूर्ण करण्यासाठी एका आठवड्याची मुदतदेखील दिली होती. संघटनेकडून देण्यात आलेली मुदत आता संपली असून सांगितल्याप्रमाणे बुधवारी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. 

या उपोषणाच्या वेळी कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी केली जाणार नाही. मंत्री सरदेसाई यांनी पीडीए लोकांवर लादली आहे. तसेच गोमंतकीयांसाठी घातक असलेला प्रादेशिक आराखडा 2021 देखील खुला केला आहे. मात्र, मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत अशाचप्रकारे आंदोलने व उपोषणे सुरुच राहतील, असेही  रोशन यांनी यावेळी सांगितले. 

रामा काणकोणकर म्हणाले, पीडीए रद्द होत नाही तोपर्यंत ही चळवळ सुरुच राहणार आहे. गोंयकारपणाची  काळजी असल्यास मंत्र्यांनी ताबडतोब  पीडीए रद्द करावी. याशिवाय टीसीपी कायदा व 73 कलम लागू करावे. प्रादेशिक आराखडा 2021 वर अभ्यास करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत मनोज गोम्स व पीटर गोन्साल्वीस उपस्थित होते.