होमपेज › Goa › पॅनकार्ड गुंतवणूकदारांचे ३० रोजी आंदोलन

पॅनकार्ड गुंतवणूकदारांचे ३० रोजी आंदोलन

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 11:57PMम्हापसा  : प्रतिनिधी

पॅनकार्ड कपंनी जनतेकडून गोळा केलेला पैसा ग्राहकांना वेळेत परत करत  नाही.   सरकार दरबारी तगादा लावूनही  याकडे कुणी लक्ष देत नाही. सरकारला जाग आणण्यासाठी दि. 30 जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रभक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डीनेशन कमिटीचे अध्यक्ष किशोर भाईडकर यांनी बुधवारी पत्रकार  परिषदेत दिली.

भाईडकर म्हणाले, की पॅनकार्ड कंपनीकडून  राज्यभरातील  35 लाख गुंतवणूकदारांना रक्कम परत  मिळावयाची आहे.  परतावा रक्कम वेळेत मिळावी म्हणून राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील गुंतवणूकदारांना संघटीत केले जाणार आहे. कमिटीतर्फे राज्यभरात गुंतवणूकदारांचे 27 मेळावे घेण्यात आले आहेत.  पॅनकार्ड क्लब कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा, असा आदेश  कोर्टाने दि. 12 मे 2017 रोजी  दिला होता.

कंपनीच्या मालमत्तेची   विक्री करणे बाबतची प्रक्रिया ही संशयास्पद आहे. मालमत्तेची    किंमत अव्यवहार्यपणे 50 ते 60 टक्क्याने कमी करण्यात येत असल्याचे भाईडकर म्हणाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शिवसेना,  भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधीसमवेत केेंद्रीय मंत्री अरूण जेटली यांची भेट  घेतली होती. अर्थमंत्री  जेटली यांनी 8 दिवसात सेबीकडे अहवाल मागवला होता. मात्र अद्यापही सेबीने राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डीनेशन कमिटीच्या मागण्यांचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे भाईडकर म्हणाले.

राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डीनेशन कमिटी   जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालया बाहेर दिवसभर धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व सेबीच्या विरूद्ध निषेध नोंदवणार आहे, असे भाईडकर म्हणाले.पत्रकार परिषदेला इन्व्हेस्टर्स वेल्फेअर फोरम महाराष्ट्राचे अध्यक्ष एन.जी. गावडे, सहखजिनदार देवानंद मुंज,  सुहास जितकर  नकुळजी पार्सेकर  उपस्थित होते.