Thu, Apr 25, 2019 15:36होमपेज › Goa › खाण कामगारांना सर्वतोपरी सहकार्य

खाण कामगारांना सर्वतोपरी सहकार्य

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:31PMडिचोली : प्रतिनिधी 

खाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डिचोली तालुक्यातील खाण  कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन आमदार राजेश पाटणेकर यांनी कामगारांना दिले. डिचोलीतील सेझा  कंपनीच्या कामगारांनी शनिवारी डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपले प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. 

सरकार दरबारी कामगारांना  सुरक्षेची हमी देण्यासंदर्भात त्रिमंत्री समितीशी चर्चा करण्याची मागणी यावेळी कामगारांनी केली. यावेळी आमदार पाटणेकर यांनी  कामगारांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच सरकार तोडगा काढणार असल्याचेही पाटणेकर यांनी  कामगारांना सांगितले. सरकारने आम्हाला कामाची हमी द्यावी यासाठी सध्या खाण कामगारांनी राजकीय नेते तसेच मंत्र्यांच्या गाटीभेटी घेण्यास सुरूवात केलेली आहे. 
चौगुले खाण कंपनीच्या  कामगारांना कमी  करण्याच्या  हालचाली सुरू झाल्याने सेझा कामगारही भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे या कामगारांत कमालीची अस्वस्थता पसरली असून सरकारने कामाची हमी द्यावी, यासाठी कामगार सरकारच्या आश्‍वासनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

खाण  कामगारांना सुरक्षेची तसेच भविष्याची  चिंता सतावू लागली असून काही कामगारांना  घरी  पाठवण्याच्या हालचालींना  वेग आल्याने सारा कामगार वर्ग भीतीच्या छायेत आहे. शनिवारी सुमारे 300 कामगारांनी पाटणेकर  यांची  भेट घेतली. 31 मार्च पर्यंत सरकारने  तोडगा काढण्याचे आश्वसन दिले होते. परंतु, अजुनही काहीच हालचाली झालेल्या दिसत नाहीत. यासंदर्भात पाटणेकर यांना विचारले असता ते म्हणाले की,  मुख्यमंत्री  रोज  कामकाजाचा आढावा घेत असून त्यांना सर्व कल्पना दिली  आहे. लवकरच या बाबत तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.  

शनिवारी किशोर लोकरे, निलेश कारबोटकर, रत्नाकर शेट्ये पांडुरंग परब, अनिल सालेलकर, दीपक पोपकर व सुमारे 300 कामगार यावेळी उपस्थित होते. सरकारला कामगारांच्या प्रश्‍नांची जाणीव असून सरकारने  कामगारांना कसलाच धोका पोहोचणार नाही याची हमी देणे गरजेचे असल्याचे  किशोर लोकरे यांनी सांगितले. सर्व आमदार कामगारांच्या  बाजूने आहेत.  पगाराची हमी कंपनीने द्यावी, मागणीही त्यांनी यावेळी केली.  

Tags : Goa, Overall, cooperation,  mine, workers