Sun, Jul 21, 2019 14:55
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › पणजीत सेंद्रीय कचरा प्रकल्प

पणजीत सेंद्रीय कचरा प्रकल्प

Published On: Jan 05 2018 1:06AM | Last Updated: Jan 04 2018 11:06PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

पणजीत सेंद्रीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प अखेर नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उभारण्यात यश आले असून हा प्रकल्प पूर्ण होण्यात अनेक अडथळे आले, तेे दूर करून हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या प्रकल्पात लवकरच अत्याधुनिक यंत्रणा बसविल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.

पणजी येथील हिरा पेट्रोलपंपानजिक उभारण्यात आलेल्या या कचरा प्रकल्पाचे उद्घाटन  झाल्यानंतर ते बोलत होते. पर्रीकर म्हणाले, सध्या पूर्ण झालेल्या या कचरा प्रकल्पावर 9 वर्षांपूर्वी पंचतारंकित हॉटेल्स उभारण्याचे कारस्थान होते. ही जागा लोकवस्तीपासून लांब असल्याने या ठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्प व्हावा म्हणून अनेक प्रयत्न केले. या प्रकल्पात अनेक अडथळे आणण्याचे प्रयत्न काहीजणांनी केले. मात्र, अनेक समस्यांचा सामना करून व हरित लवादाची मान्यता मिळवून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या यंत्रणेत नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न सुरू असून नवीन यंत्रणेतून होणार्‍या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत दुर्गंधीची समस्या पूर्णपणे बंद होईल. 

उपसभापती मायकल लोबो म्हणाले, कचरा व्यवस्थापनासाठी भाजप सरकाकडून अनेक प्रयत्न होत असून यात आता लोकांचे सहकार्य मोलाचे आहे. गोव्यात ठिकठिकाणी असे प्रकल्प होणे आवश्यक असून पर्यटनाच्यादृष्टीने ते फार महत्त्वाचे आहेत.

व्यासपीठावर जीएसआयडीसीचे अध्यक्ष तथा सावर्डे चे आमदार दीपक पाऊसकर, पीडीएचे अध्यक्ष तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो,म, महानगरपालिकेचे आयुक्त अजित रॉय,  नगरसेवक शुभम चोडणकर, पांडुरंग राऊत देसाई, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. शुभम चोडणकर यांनी आभार मानले.

स्वच्छ शहरासाठी एक पाऊल पुढे : पाऊसकर

हा प्रकल्प सुमारे 1 हजार 318 .66 चौरस मीटर जागेत असून यासाठी सुमारे 3.2 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. या प्रकल्पातून शहर सुंदर व स्वच्छ बनविण्याच्या स्वप्नाकडे आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चांगल्या गोष्टींना काही लोक विरोध करतात. मात्र, त्यातूनही प्रामाणिकपणे प्रकल्पासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे आमदार दीपक पाऊसकर म्हणाले.