Mon, Aug 19, 2019 00:42होमपेज › Goa › खाणींवर सुरक्षा उपायांचे आदेश

खाणींवर सुरक्षा उपायांचे आदेश

Published On: Jun 01 2018 1:58AM | Last Updated: Jun 01 2018 12:21AMडिचोली : प्रतिनिधी 

डिचोली तालुक्यातील विविध खाण पिटांची गुरूवारी  उपजिल्हाधिकारी कॉलेन मदेरिया यांनी पाहणी केली. मुळगाव व लामगावातील खाण पिटाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करून त्यांनी तातडीने सुरक्षेबाबत आवश्यक  उपाय करा, असे  आदेश दिले.मुळगावातील  खाण  परिसरातील जो ढिगारा आहे तो नवा असून बसलेला नाही, त्यामुळे तो कोसळणाची  भीती  आहे. तसेच लामगाव येथे खाण  पिटातील मातीचा भराव कोसळलेला असून पावसात आपत्ती येऊ नये,  याबाबत तातडीने उपाय करा, असे आदेश उपजिल्हाधिकार्‍यांनी  प्रशासनाला दिले. त्यांनी मामलतदार मधु नार्वेकर, जलस्त्रोत खात्याचे अभियंते के. पी. नाईक तसेच सर्व कंपनीचे अधिकारी व इतर  सरकारी अधिकार्‍यांसमवेत  डिचोली, मुळगाव, पैरा,  लामगाव , शिरगाव,  अडवलपाल आदी भागातील  खाणींची पाहणी केली.

खाण पिटातील पाणी तसेच पावसाचे पाणी याचा पावसात योग्य निचरा होणे गरजेचे असून मातीचे ढिगारे कोसळून आपत्ती  ओढवण्याचा  धोका  असतो. डिचोलीत गेल्या वर्षी  खाणींच्या पिटाचे पाणी झिरपून मातीचा भराव शहरात घुसल्याने मोठी आपत्ती कोसळली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पावसाचे  आगमन लवकरच असल्याने पुन्हा असे संकट  येऊ नये,  यासाठी उपाययोजना करा, असेही सांगण्यात आले. कंपनी अधिकार्‍यांनी आपल्या भागातील खाण पिटातील कामाचा व सुरक्षा उपाययोजनांचा तपशील द्यावा, असेही आदेश असून खाणी  बंद असल्याने  कंपनीने  सुरक्षा उपाय केले कीनाही, याचा आढावा पाहणी करून  अधिकार्‍यांनी घेतला.