Thu, Jul 18, 2019 04:54होमपेज › Goa › पेवल परेराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

पेवल परेराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

मांडोप नावेली येथील पेवल परेरा या नऊ वर्षीय कर्करोगग्रस्त मुलीला हॉस्पिसिओच्या रूग्णवाहिकेतून गोमेकॉ  इस्पितळात उपचारासाठी नेण्यास  दिरंगाई झाल्याने तिचा मृत्यू झाला की काय  याविषयीची  चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे  यांनी सांगितले. 

मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळातून गंभीर अवस्थेत या चिमुकलीला  5 सप्टेंबर रोजी अधिक उपचारांसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवण्याचे ठरविण्यात आले होते. त्यावेळी गोमेकॉत जाणार्‍या रुग्णवाहिकेत एकाहून अधिक रुग्ण घेऊन जाण्याच्या प्रयत्नामुळे रूग्णवाहिका रवाना होण्यात दिरंगाई झाली. या प्रसंगी वेळेत रक्तपुरवठा न झाल्याने पेवल हिला बुधवारी  जीव गमवावा लागला. ‘हॉस्पिसियो’चा निष्काळजीपणाच पेवल हिच्यासाठी जीवघेणा ठरल्याचे सांगून पेवलच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूला  सरकारच जबाबदार असल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणाची आपल्याला माहिती मिळताच सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. ते म्हणाले की,  या घटनेत नेमके काय व कसे घडले याची माहिती घेण्यात आली आहे. पेवलची प्रकृती गंभीर होती हे समजून तिला तात्काळ गोमेकॉत पाठवणे आवश्यक होते. रुग्णवाहिकेत एकाहून अधिक रुग्ण मिळण्यासाठी वाट पाहण्याची खरेच आवश्यकता नव्हती. चौकशी अहवालानंतर योग्य ती कारवाई करू.

दरम्यान, दक्षिण गोव्याचे नवीन जिल्हा इस्पितळ बांधून तयार झाल्यावर  गोमेकॉशी ते संलग्न केले जाणार आहे. गोमेकॉतील काही विभाग जिल्हा इस्पितळातही स्थापन केले जाणार असून आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मनुष्यबळही दिले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.