Mon, Jan 21, 2019 20:08होमपेज › Goa › ‘ऑर्चर्ड’ जमिनींची विक्री यापुढे दखलपात्र गुन्हा : मंत्री सरदेसाई

‘ऑर्चर्ड’ जमिनींची विक्री यापुढे दखलपात्र गुन्हा : मंत्री सरदेसाई

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 11:52PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात जवळपास एक कोटी चौरस मीटर ऑर्चर्ड जमिनींची बेकायदेशीरपणे प्लॉट करून त्यांची विक्री झाल्याचे आढळून आले आहे. सदर जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉट करून त्यांची विक्री करणे दखलपात्र गुन्हा ठरणार असल्याचे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात सांगितले. अशा प्रकारची राज्यभरात 99 उल्‍लंघने समोर आल्याचे सांगून  अशा बेकायदेशीर गोष्टी आढळून आल्यास  एक वर्ष कैदेची शिक्षा व 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी वरील ऑर्चर्ड जमिनींची  बेकायदेशीरपणे विक्री संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर मंत्री सरदेसाई बोलत होते. आमदार काब्राल  म्हणाले की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी नगरनियोजन खाते व महसूल खात्याची  एक संयुक्‍त समिती स्थापन करावी. या समितीमुळे अशा बाबींवर करडी  नजर ठेवणे शक्य होणार  आहे.

मंत्री सरदेसाई म्हणाले की, कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे आता या जमिनींची बेकायदेशीरपणे प्लॉट करून त्यांची विक्री करणे दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. राज्यात आतापर्यंत अशी 99 उल्‍लंघने समोर आली असून संबंधीतांविरोधात गुन्हे नोंद करण्यात   आले आहेत. बार्देश येथे अशी 3, पेडण्यात 6, डिचोलीत 27, सत्तरीत  4 तर  केपे, सांगे व धारबांदोडा येथे मिळून 44 उल्‍लंघनांची नोंद झाली आहे.  अशा बेकायदेशीर गोष्टींवर आळा आणण्यासाठी  प्रसंगी अंमलबजावणी पथकाची स्थापना केली जाणार असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.