होमपेज › Goa › विरोधकांनी बोलण्याची संधी गमावली : सभापती  

विरोधकांनी बोलण्याची संधी गमावली : सभापती  

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:32AMपणजी : प्रतिनिधी

गोंधळ माजवून सभागृहाचे कामकाज वाया घालवणे योग्य नाही. फार्मेलिनप्रश्‍नी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोलणे अपेक्षित होते, मात्र संधी असूनही ते बोलले नाहीत, असे गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विरोधकांनी सभागृहाचा वेळ वाया घालवला. त्यांनी कामकाज   स्थगित करण्याची नोटीस दिली. मात्र त्यात कुठेही प्रश्‍नोत्तर तास स्थगित करा, असा उल्‍लेख नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सावंत  म्हणाले,  फामेर्र्लिन प्रश्‍नी  गुरुवारी  प्रश्‍नोत्तर तासानंतर म्हणजे 12.30 वा. नंतर लक्षवेधी सूचना मांडली गेल्यानंतर चर्चा करावी, असे विरोधकांना सांगितले होते. परंतु त्यांनी ही लक्षवेधी सूचना मांडल्यानंतरदेखील त्यावर चर्चा केली नाही. या विषयावर बोलण्याची संधी असूनही ते बोलले नाहीत.विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यामुळे  सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. शुक्रवारी विरोधकांनी कामकाज स्थगिती प्रस्ताव न मांडताच फार्मेलिनवर चर्चा करण्याची मागणी केली. ज्या विषयावर लक्षवेधी सूचना आहे त्याच विषयासाठी  पुन्हा  स्थगिती   प्रस्तावाची गरज नसते, असेही सभापतींनी सांगितले.शोक प्रस्तावात काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांच्या नावाचा समावेश होता. परंतु त्यावेळीही विरोधी काँग्रेस पक्षाने गोंधळ घातला, असे डॉ. सावंत  यांनी सांगितले.