होमपेज › Goa › मयेत खर्‍या अर्थाने संस्कृती, कला जतनाचे कार्य  

मयेत खर्‍या अर्थाने संस्कृती, कला जतनाचे कार्य  

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:28AMडिचोली : प्रतिनिधी 

मये  गावात गोव्याच्या संस्कृतीची मुळे  खोलवर रुजलेली असून इथे खर्‍या अर्थाने  संस्कृती व कलेच्या जतनाचे काम गेली अनेक वर्षे होत आहे. याठिकाणी लोकांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवून खरे गोवेकरपण तेवत ठेवण्यासाठी प्रामाणिक  प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण कलाकारांना संधी देऊन त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी मये महोत्सव महत्त्वाचा  आहे,असे प्रतिपादन  नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी मये येथे केले. रायझिंग युथ मये आयोजित मये महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत  होते.

मयेतील  महामाया प्रांगणात आयोजित या भव्य दिव्य  महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी कला  व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, जिल्हा पंचायत  सदस्य 
शंकर चोडणकर ,सरपंच विश्‍वास चोडणकर , प्रशांत नाईक, डॉ.हनुमंत चोपडेकर ,पंढरी वर्णेकर ,मनिषा आमोणकर, कृष्णा  ,कृष्णा नाईक ,गायिका सोनिया सिरसाट,  रूपेश ठाणेकर व सिने अभिनेता संतोष जुवेकर आदी उपस्थित होते.

सरदेसाई म्हणाले, मयेवासीयांनी स्वाभिमान जागृत ठेवून स्थानिक नेतृत्त्वाला चालना  देण्यासाठी  संघटित होणे गरजेचे आहे.  आमचे सर्व ते सहकार्य आणि पाठिंबा मयेवासीयांना लाभेल,असे सांगून  गोवा फॉरवर्ड  मयेतून निवडणूक  लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच केले  . 

मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले,की कलाकारांना  नवी ऊर्जा देऊन नवी उमेद व संधी देण्यासाठी  मये  महोत्सवासारखे उत्सव महत्त्वाचे असून या महोत्सवाला  सरकार सर्व ते  सहकार्य  देण्यास  कटिबद्ध आहे. अनेक नव्या योजना आखून आपली संस्कृती व मातृभाषा   टिकवण्यासाठी  सरकारचे  प्रयत्न आहेत. 

डॉ हनुमंत चोपडेकर  यांनी सांगितले,की मयेतील रहिवाशांवर  पारतंत्र्याचे भूत असून राजकीय नेतृत्वही  अनेक वर्षे लादले जात आहे. अनेक प्रश्‍न  अनुत्तरित आहेत,यातून मार्ग काढून स्वाभिमानी मयेकरांनी एकजूट ठेवणे गरजेचे आहे.  मये ही कलाकाराची,  राष्ट्रभक्तांची   खाण   असून देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, आता नवी दिशा नवा मये घडवण्यासाठी संघटित  प्रयत्न होणे  गरजेचे आहे. 

रुपेश ठाणेकर यांनी स्वागत केले व आयोजनाचा हेतू  विषद  केला. या वेळी पांडुरंग दादी रघु गावकर हार्मोनियम ,आत्माराम नाईक नाट्यकलाकर , गणेश घाडीलोकनृत्य ,अग्नेल्लो फुर्तादो तियात्र कलाकार  नारायण सावंत नाट्यकलाकार ,शेख नूर महम्मद नाट्यकलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 

या वेळी  ‘मये आयडॉल’  व ‘गोवा रायझिंग  आयडॉल’ या स्पर्धा  तसेच विविध लोककलांचे दर्शन घडवण्यात आले. पारंपरिक मिरवणुकीने  व्यासपीठावर  सर्व मान्यवरांचे आगमन झाले.  सम्राट क्लब च्या  कलाकारांनी सादर केलेल्या  नांदीने  महोत्सवाचा प्रारंभ  झाला,दीप प्रज्वलनाने  उदघाटन झाले. काशिनाथ मयेकर यांनी आभार मानले. दोन  दिवशीय महोत्सवात  रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.