Tue, Nov 13, 2018 08:51होमपेज › Goa › वारसास्थळांबाबत मंत्र्यांचा खोटारडेपणा ‘उघड करू’ 

वारसास्थळांबाबत मंत्र्यांचा खोटारडेपणा ‘उघड करू’ 

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील वारसा स्थळे खासगी आस्थापनांना दत्तक देण्याविषयी पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई आणि पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांना पूर्ण कल्पना असूनही ते जनतेशी खोटे बोलत आहेत. यासंबंधी दोन्ही मंत्र्यांनी दोन दिवसात माफी न मागितल्यास त्यांचा खोटारडेपणा कागदोपत्री पुराव्यांसह उघडकीस आणू,असा इशारा  गोवा प्रदेश काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 

चोडणकर म्हणाले, की केंद्राने राज्यातील सहा महत्वाची वारसा स्थळे दत्तक देण्यासंबंधी राज्य सरकारला अंधारात ठेवल्याचे जे विधान मंत्री सरदेसाई यांनी केले आहे, ते खोटे आहे. उलट केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याआधी राज्याला विश्‍वासात घेतले होते. राज्य सरकारच्या पुरातत्व आणि पर्यटन खात्याच्या मान्यतेनेच केंद्र सरकारने सदर निर्णय घेतल्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. मात्र, मंत्र्यांना जनतेशी खोटारडापणा केल्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागण्यासाठी आपण त्यांना दोन दिवसांची मुदत देत आहोत. 

गोवा फॉरवर्डने विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल आवाज उठवला होता. मात्र सरकारात सामील झाल्यानंतर या पक्षांच्या नेत्यांचा सूर बदलला. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना घटक पक्षांचे मंत्री केंद्र राज्याला विश्‍वासात घेत नसल्याचा आरोप  करतात,हे  संयुक्तीक वाटत नाही. घटक पक्षातील मंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत. या मंत्र्यांना गोवा राज्यही केंद्राकडे गहाण ठेवल्यासारखे वाटत आहे का, की त्यांच्यावर केंद्राकडून दबाव येत आहे, याचा खुलासा व्हावा, असेही चोडणकर  म्हणाले. 

मुख्यमंत्री नेमणुकीसाठी आंदोलन छेडणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असून अमेरिकेत उपाचारार्थ गेल्याने राज्यात मागील अडीच महिने मुख्यमंत्री पदाचे कार्य सुरू नाही. मंत्रिमंडळाची एकही बैठक घेतली जात नाही, की अनेक महत्वाच्या प्रश्‍नांवर तोडगा निघत नाही. त्रिमंत्री  समितीला अधिकार नसल्याने ती निष्क्रीय ठरली आहे. मुख्यमंत्री आजारी पडल्याने सर्व राज्यच  आजारी पडले असून जनतेला वेठीस धरले जात आहे. राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून हंगामी  मुख्यमंत्री नेमावा, अथवा विद्यमान सरकार बरखास्त करावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली. चोडणकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा ताबा घेतल्यानंतर मुख्यमंत्री नेमण्याबाबत पहिले आंदोलन छेडणार असून त्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. 

Tags : Goa, Open, up, ministers, liars, heritage, sites