Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Goa › पणजीत खारफुटीतील ‘वॉक वे ’खुला

पणजीत खारफुटीतील ‘वॉक वे ’खुला

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 11:33PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील व देशातील पहिलेवहिले  खुले खारफुटीचे उद्यान तथा ‘वॉक वे’ पणजीतील रुआ द ओरेम खाडीवर उभारण्यात आला आहे. सुमारे 1100 चौरस मीटर्स क्षेत्रफळात उभारण्यात आलेल्या या अभिनव ‘वॉक वे’ साठी केंद्राच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत सुमारे 2.27 कोटी रूपयांचा निधी खर्चण्यात आला आहे, अशी माहिती ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’ चे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांनी दिली.

पाटो येथील संस्कृती भवनाच्या मागील बाजूला खारफुटीच्या ‘वॉक वे’ चे उद्घाटन नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी कुंकळकर म्हणाले की,  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खारफुटीची रचना नैसर्गिकरित्या करण्यात आली आहे.  पर्यावरण रक्षणाचे काम खारफुटीचे जंगल करते. या खारफुटीचे जतन करण्यासोबत त्याची भावी पिढीला 

वेगळ्या पद्धतीने माहिती देण्यासाठी हा खुला ‘वॉक वे’ बांधण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आलेले असून ओरेम खाडीवरील जुन्या पाटो पुलापर्यंतचे दुसर्‍या टप्प्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. स्थानिकांसोबत विद्यार्थी आणि पर्यटकांनाही खारफुटीची सविस्तर माहिती येथे मिळणार आहे.  

मंत्री डिसोझा म्हणाले की, खारफुटीचे सुमारे 14 प्रकार असून त्यांची शास्त्रीय माहिती देणारी जागाच राज्यात उपलब्ध नव्हती. या खुल्या ‘वॉक वे’ मुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही निसर्गात काही क्षण रमण्याची संधी मिळणार आहे. स्मार्ट शहराबरोबरच निसर्गाला बाधा न आणता विकासकाम व सौंदर्यीकरण करण्याचे ‘वॉक वे’ हे उत्तम उदाहरण आहे. 
या कार्यक्रमाला पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक, ‘इमॅजीन पणजी’चे अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.