Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Goa › कोकण, कर्नाटकातून फक्‍त ५ ट्रक मासळी दाखल

कोकण, कर्नाटकातून फक्‍त ५ ट्रक मासळी दाखल

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMमडगाव : प्रतिनिधी  

परराज्यातून होणार्‍या मासळी आयातीवर गेल्या पंधरा दिवसांपासून  असलेली बंदी शुक्रवारी (दि. 3) उठली असून महाराष्ट्र (कोकण), कर्नाटकातून मडगाव घाऊक मासळी बाजारात आलेल्या पाच ट्रक मासळीच्या लिलावाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र केरळ, ओडिशा, तामिळनाडू या राज्यातील मासळी मडगाव घाऊक बाजारात न आल्याने मासळी व्यवसायावर अजूनही ‘फार्मेलिन’ची  टांगती तलवार असल्याचे चित्र दिसून आले. पत्रादेवी व पोळे चेकपोस्टवर एफडीए कर्मचार्‍यांकडून मासळीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

दरम्यान, गोव्यातून विविध जेटींवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले ट्रॉलर्स अद्याप किनार्‍यावर आलेले नसून रविवारी पहाटेपर्यंत दाखल होतील, असे ट्रॉलर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सावियो दा सिल्वा यांनी सांगितले. 

मडगावच्या घाऊक मासळी बाजारात दाखल झालेल्या मासळीत फार्मेलिन हे घातक रासायनिक घटक आढळल्याने गोमंतकीय खवय्यांनी मासळीकडे काही दिवस पाठ फिरवली होती. आयातीवरील बंदी संपुष्टात आली असून शनिवारी पहाटे 2.30 वा. परराज्यातून सुमारे पाच ट्रक दाखल झाले, असे घाऊक मासळी बाजाराचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी सांगितले. 

इब्राहिम म्हणाले की,  कर्नाटकातून होन्नावर येथून तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून पाच ट्रक भरून मासळी मडगाव घाऊक मासळी बाजारात पहाटे  2.30 वाजण्याच्या सुमारास पोहचली. त्यापूर्वी सरकारच्या आदेशानुसार राज्यात गोवा-कर्नाटक आणि गोवा-महाराष्ट्र या  सीमांवर अन्न आणि औषध प्राधिकरणाकडून मासळीची तपासणी झाली. मडगाव घाऊक मासळी बाजारात हे ट्रक दाखल होताच पुन्हा त्यांची तपासणी फिरत्या प्रयोगशाळेत करण्यात आली. चाचणीचा अहवाल अर्ध्या   तासात मिळाल्यावर मासळीचा लिलाव करण्यात आला. यावेळी परराज्यातून   कोळंबी, इसवण, वेरली, लेपो, दोडयारे, ही मासळी आली होती. या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला असूनही मासळी हातोहात खपली. 

मासळीत फार्मेलिन असल्याचा प्रकार उघड होण्यापूर्वी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात परराज्यातून  सुमारे 15 ते 20 ट्रक दररोज येत होते. परिणामी त्यानंतर बाजाराचे स्वरूपच बदलले असून व्यापार स्थिती कोलमडली आहे. शुक्रवारी  आयातीवरील बंदी उठल्याने जास्त ट्रक दाखल होणार, अशी मासळी विक्रेत्यांची   अपेक्षा होती. मात्र, केवळ पाच ट्रकच तेही केवळ महाराष्ट्र व कर्नाटक भागातून दाखल झाल्याने  विक्रेत्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून मासळीच्या दरात चढउतार होत असून काल बारीक कोळंबी 250 ते 350 रुपये वाटा याप्रमाणे उपलब्ध होती.  छोटे आठ बांगडे 200 रुपयांना तर दहा बांगडे 250 रुपयांना. शेवटा 350 रुपये किलो, लेपो 200 रुपये  किलो, बारीक मुड्डोशी 800 रुपये तर मोठी मुड्डोशी 1000 रुपयाला किलो अशा दरात उपलब्ध आहे. दोडयारे 350 रुपये किलो, असा भाव या बारीक गावठी मासळीला असून लहान तांबडे ताम्बसो 500 ते 550 रुपयांना  तर इसवण 600 ते 900 रुपये दरात विकण्यात आल्याची माहिती   गोन्साल्विस  यांनी दिली.

‘एफडीए’ चाचणीनंतरच मासळी लिलाव

गोमंतकीयांच्या  आरोग्याचा प्रश्न मासळीशी निगडित असल्याने  ‘एफडीए’ने मासळीची नियमित तपासणी करावी. दरदिवशी परराज्यातून येणारे मासळीचे ट्रक सीमेवर तपासून घ्यावेत. त्यानंतर  मडगाव घाऊक मासळी बाजारात येणार्‍या प्रत्येक मासळीचे नमुने तपासून झाल्यावरच मासळीचा लिलाव केला जाईल, असे इब्राहिम यांनी  सांगितले. 

बाजारात केवळ इसवण, रावसच ः गोन्साल्विस

एसजीपीडीए मासळी बाजारातील  व्यापाराविषयी  किरकोळ मासळी बाजारचे अध्यक्ष फेलिक्स गोन्साल्विस यांनी सांगितले की, आयातीवरील बंदी  उठली असली तरी अपेक्षेप्रमाणे मासळी  गोव्यात दाखल झालेली नाही.  एसजीपीडीए मार्केटमध्ये स्थानिक मच्छीमारांनीच आणलेली मासळी उपलब्ध होती. परराज्यातून आलेल्या मासळीपैकी केवळ इसवण व रावस हेच दोन प्रकारचे मासे बाजारात विक्रीसाठी किरकोळ बाजारात आले असून बाकी सर्व मासळी स्थानिक मच्छीमारांकडून प्राप्त झाली आहे.  लोकांनी  संभ्रम न बाळगता मासळी खरेदी करावी, असे आवाहन गोन्साल्विस  यांनी केले आहे.

‘मासळी व्यापार मंदावला’

मासळीच्या सुरक्षिततेविषयी सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने मासळी व्यापार मंदावला आहे, असे घाऊक मासळी बाजार समितीचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी सांगितले. ते म्हणाले, केरळ, ओडिशा, तमिळनाडू या राज्यातील एकही ट्रक शनिवारी गोव्यात आला नसून बाजारात  महाराष्ट्र, कर्नाटकातूनच  मासळीचा पुरवठा झाला. सदर राज्यातील ट्रक नेमके कोणत्या कारणामुळे  राज्यात दाखल झाले नाहीत, याचा बसल्या ठिकाणी अंदाज बांधणे कठीण आहे.परिणामी त्यांच्या राज्यातही मासळीचा तुटवडा असल्यानेही ते दाखल झाले नसावेत, अशी शंकाही इब्राहिम  यांनी  व्यक्‍त केली.