Sun, Oct 20, 2019 11:23होमपेज › Goa › ‘दूधसागर’कडे जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा

‘दूधसागर’कडे जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:57AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी आता पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुरू करण्याचा सरकारचा विचार असून याबाबतचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिली. 

सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी वाहनांअभावी पर्यटकांना दूधसागर येथे जायला मिळत नसल्याच्या तक्रारींबाबत  विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी वरील माहिती दिली.

दीपक पाऊसकर म्हणाले, दूधसागर पर्यटनस्थळी दरदिवशी अडीच हजार ते 3 हजार लोक भेट देतात. 2016-2017 साली दूधसागराला 3 लाख 29 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. यावर्षी आतापर्यंत दीड लाख जणांनी भेट दिली. दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी वन खात्याकडून  केवळ 225 जीप ना  परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात तेथे 431 जीप आहे. कर्ज घेऊन  पर्यटकांची वाहतूक करण्यासाठी  या जीप खरेदी करण्यात आल्या आहेत.  त्या सर्वांना देखील परवानगी द्यावी, अशी मागणीही पाऊसकर यांनी केली.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, पर्यटन स्थळ असलेल्या  दूधसागर संदर्भात विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी 16 डिसेंबर रोजी वन्यजीव मंडळाची बैठक होणार आहे. दूधसागर परिसर हा वन्यजीव संवेदनशील परिसर असल्याने या मंडळाच्या शिफारसीनुसार, राज्य सरकार आवश्यक ती पावले उचलणार आहे.

वाहनांअभावी  दूधसागर येथे  पर्यटकांना  जायला मिळत नाही.  त्यावर तोडगा म्हणून सरकार येथे जाण्यासाठी आता पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.