Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Goa › कुटबण येथे एकाचा खून ; दोघांना अटक

कुटबण येथे एकाचा खून ; दोघांना अटक

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 11:51PMमडगाव : प्रतिनिधी

कुटबण येथे तिघांमध्ये झालेल्या भांडणात संतोष बाग (वय 18) याने ज्ञानेश्‍वर बाग (20) याच्या मदतीने सहकारी प्रताप सिंह (25, ओडिसा) याचा चाकूने गळा कापून खून करण्याची घटना शुक्रवारी (दि.24)रात्री उशिरा घडली. कुंकळी पोलिसांनी दोघा संशयितांना शनिवारी सकाळी कुमयाभाट कुंकळी येथील रानातून पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली.

कुंकळी पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित संतोष, ज्ञानेश्‍वर आणि मृत प्रताप हे कुटबण येथील नारायण कृपा ट्रॉलरवर मासेमारी करण्याचे काम करत होते. रोजच्यासारखे शुक्रवारी रात्री कुटबण येथील जेटीजवळील ट्रॉलरवर बसून जेवत असताना तिघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यातच संतोष याने ज्ञानेश्‍वर याच्या मदतीने प्रताप याचा गळा कापून खून केला. ट्रॉलरवरील तांडेल धर्मा बिरा याने कुंकळी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केल्यावर खुनाला वाचा फुटली.

पोलिसांनी कुंकळी भागात रात्रभर गस्त घालून तपास केल्यानंतर शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास कुमयाभाट येथील रानातून पळून जाण्याचा तयारीत असताना गस्तीवरील पोलिसांनी सशयितांच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी तक्रार नोंद झाल्यावर संशयितांना त्वरित पकडण्यासाठी दक्षिण गोवा उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळ्ळी, चिंचणी, असोल्डणा, दांडेवाडी या ठिकाणी नाकाबंदीही केली होती. तिघेही मूळ ओडिशा येथील रहिवासी असून गोव्यात ट्रॉलरवर मासेमारी करण्याचे काम करत होते. पोलिसांनी भा.दं.सं. कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.  पुढील तपास पोलिस करीत आहेत.