Thu, Apr 25, 2019 21:49होमपेज › Goa › स्तन कर्करोगाबाबत एक लाख महिलांची चाचणी 

स्तन कर्करोगाबाबत एक लाख महिलांची चाचणी 

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:05AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सुमारे एक लाख महिलांची स्तन कर्करोगाबाबत येत्या ऑक्टोबरमध्ये तपासणी केली जाणार आहे. महिलांची स्तन कर्करोगाबाबत वैद्यकीय तपासणी करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य  ठरणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. 

महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी नियमित आणि वेळेवर वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. पूर्वीप्रमाणे महिलांच्या तपासणीसाठी मोठे वाहन घेऊन फिरण्याची आता गरज राहिलेली नाही. एक छोटे उपकरण उपलब्ध झालेले असून त्या उपकरणाद्वारे महिलांची चाचणी केली जाणार आहे. या कामासाठी राज्यातील सुमारे 2500 अंगणवाडी कर्मचार्‍यांना नियुक्त केले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांना महिना एक हजार रूपये अतिरिक्त मानधन  दिले जाणार आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. ‘लाईव्ह सायन्स’ या संस्थेशी सरकारचा लवकरच करार होणार आहे.  स्तन कर्करोगसंबंधी  चाचणीत  एखाद्या महिलेमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसून आली, तर त्यानुसार उपचार करून घेता येणे शक्य होणार आहे.  देशात अजून अशा प्रकारचा प्रकल्प अन्य कुठेच राबवला गेलेला नाही, असेही ते म्हणाले.

लवकरच ‘डायबेटीक सेंटर ’ 

राज्यात लवकरच आरोग्य खात्यातर्फे डायबेटीक केअर सेंटर सुरू करणार आहोत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, या कार्यक्रमानुसार सर्व आरोग्य केंद्रांमध्ये इन्सुलीन मोफत दिले जाणार आहे. ‘नोवा नॉर्डीस्क’ संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवणार आहोत. मधुमेही व्यक्तींची पूर्ण काळजी या कार्यक्रमानुसार घेतली जाईल. येत्या 20 सप्टेंबर रोजी राज्यातील पहिले आणि सर्वयोयींनी युक्त असे ‘डायबेटीक सेंटर’चे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. राज्यातील लोकांसाठी ‘डायबेटीक रजिस्ट्री’ ठेवली जाणार आहे, असे मंत्री राणे म्हणाले.