Sun, Feb 23, 2020 17:30होमपेज › Goa › खनिज डंपच्या ई-लिलावात शंभर कोटींचा महसूल

खनिज डंपच्या ई-लिलावात शंभर कोटींचा महसूल

Published On: Aug 25 2019 1:16AM | Last Updated: Aug 25 2019 1:16AM
पणजी : प्रतिनिधी

मागील दोन दिवसांत 1.7 दशलक्ष टन खनिज मालाचा ई लिलाव करण्यात आला. यामुळे सरकारला 100 कोटी रुपयांचा महसूल प्राप्‍त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर सरकारकडून जेटीवर डंप स्वरुपात असलेल्या खनिज मालाचा ई लिलाव केला जात आहे. या ई लिलावाव्दारे सरकारला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्‍त झाला आहे.

गोवा सरकारने 22, 23 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा खनिज मालाचा ई लिलाव केला. 5.3 दशलक्ष  टन खनिज माल यावेळी ई लिलावासाठी उपलब्ध करण्यात आला होता. त्यानुसार 22 व 23 ऑगस्ट अशा दोन दिवसांत 5.3 दशलक्ष टन खनिज मालापैकी केवळ 1.7 दशलक्ष टन खनिज मालाचा ई लिलाव करण्यात आला.

या ई लिलावासाठी प्रती टन 400 रुपये इतकी आधारभूत किंमत ठरवण्यात आली होती. मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएसटीसी)च्या माध्यमातून हा ई लिलाव करण्यात आला होता. या ई लिलावातून 100 कोटी रुपयाचा महसूल प्राप्‍त झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या ई लिलावात 13 कंपन्यांनी बोली लावली होती. 2012 साली सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील खाण व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारने राज्यातील विविध खनिज जेटींवर सुमारे 15 दशलक्ष टन खनिज माल असल्याचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार या खनिज मालाचा ई लिलाव केला जात आहे. या खनिज मालापैकी आतापर्यंत 10 दशलक्ष टन खनिज मालाचा ई लिलाव करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये खाण बंदी उठवल्यानंतरदेखील खाण व्यवसायाला हवी तशी चालना मिळाली नाही. मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील नूतनीकरण करण्यात आलेले 88 खनिज परवाने रद्द केले. त्यामुळे राज्यातील खाण व्यवसायाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.