Tue, Jul 16, 2019 02:17होमपेज › Goa › २८ लाख लाटल्याप्रकरणी एकास अटक

२८ लाख लाटल्याप्रकरणी एकास अटक

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 1:13AMदाबोळी : प्रतिनिधी

लॉजीकॅश सोल्यूशन प्रा. लि. कंपनीने  एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी दिलेले 28 लाख रुपये   घेऊन पोबारा केलेल्या शिवानंद मास्तोळी या 26 वर्षीय युवकाला वास्को पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. प्रथमश्रेणी न्यायालयात बुधवारी त्याला उभे केले असता  7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

लॉजी कॅश सोल्यूशन ही कंपनी एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे कंत्राट घेते.   या कंपनीत  शिवानंद   एटीएम  मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम करीत असे.  त्यानुसार व्यवस्थापकाने 3 मे रोजी त्याला नुवे आणि मडगावातील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम दिले होते. मात्र, संशयित शिवानंदने 28 लाख रुपये एटीएमध्ये न भरता ते घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापकाने शिवानंद विरोधात 3 मे रोजी तक्रार दाखल केली होती.

पोलिस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार  लॉजीकॅश सोल्यूशन कंपनी व्यवस्थापकाने  दिलेल्या तक्रारीस अनुसरून  संशयित शिवानंदच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तो वाडे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वास्को पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. मेर्सिस वाडे येथे एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे समजताच मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचून संशयिताला अटक केली. मूळ कर्नाटकातील असलेल्या शिवानंदचे कुटुंब ड्रायव्हरहिल वास्को येथे वास्तव्यास आहे.

संशयित शिवानंद हा एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम करीत असे. याच बाबीचा लाभ घेऊन त्याने नुवे व वास्को येथील एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले 28 लाख रुपये परस्पर लाटले. मात्र, मंगळवारी रात्री पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे काहीही आढळून आले नाही. वास्को पोलिस याविषयी अधिक तपास करीत आहेत.