Thu, Feb 21, 2019 11:55होमपेज › Goa › मोबोर येथे शॅक वाहून गेला 

मोबोर येथे शॅक वाहून गेला 

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:28AM

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी 

‘ओखी’ चक्रीवादळाचा फटका दक्षिण गोव्यातील समुद्र किनार्‍यांवरील शॅक्स व्यावसायिकांनाही बसला. मोबोर  किनार्‍यावर शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी अचानक समुद्राच्या पातळीत दोन ते अडीच मीटर्सनी वाढ झाल्याने एक शॅक पूर्णपणे वाहून गेला असून इतर तीन शॅक्समध्ये पाणी शिरल्याने शॅक मालकांचे मोठे  नुकसान झाले.

शॅक मालक रुझारियो फर्नांडिस यांनी पुढारीशी बोलताना सांगितले, की   पुन्हा पाण्यात वाढ होणार नाही, असे गृहीत धरून रविवारी दैनंदिन कामांना पुन्हा सुरुवात केली होती. पण  सकाळी 11 च्या सुमारास अडीच मीटर्सपेक्षा जास्त पाणी वाढले. यावेळी शॅकमधील टाईल्सची उंची वाढविण्यासाठीचा मातीचा भराव वाहून गेला. तरीही प्रसंगावधान राखून तेथील सर्व सामान दुसर्‍या शॅकमध्ये हलविले. मात्र संपूर्ण शॅक पाण्यात वाहून गेले असून, केवळ स्वयंपाकघराचा काही भाग शिल्लक राहिला. जवळच्या कोर्नरियो शॅकपर्यंत समुद्राचे पाणी पोहचले. सुमारे 30 बेड्स पाण्यात बुडाल्या. कोलवा, सेर्नाभाटी, तसेच वार्कां आणि बेतालभाटी किनार्‍यांवरही  समुद्र पातळीत वाढ झाल्यामुळे शॅक मालक आणि वॉटर स्पोर्टस् व्यावसायिकांचे बरेच हाल झाले.