Thu, Jul 18, 2019 16:42होमपेज › Goa › पेडणेतील किनार्‍यांना पुन्हा ‘ओखी’चा तडाखा

पेडणेतील किनार्‍यांना पुन्हा ‘ओखी’चा तडाखा

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

हरमल : वार्ताहर 

‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा दुसर्‍या दिवशी सोमवारी पुन्हा पेडणे तालुक्यातील हरमल केरी-तेरेखोल समुद्र किनार्‍यांना बसला असून  येथील शॅक व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला. खवळलेल्या समुद्राचे पाणी शॅक्समध्ये घुसून अनेक ठिकाणी पडझड झाली तर काहींची विजेवर चालणारी उपकरणे निकामी झाली. हरमल भागात अंदाजे 13 -14 लाख रुपयांची व केरी तेरेखोल भागात सुमारे 15 लाख रुपयांचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. 

हरमल किनार्‍यावरील ‘मॅक्सस्ट्रॉन’ शॅकची पडझड होऊन सुमारे 7 ते 8 लाख रुपयांची हानी झाली आहे. शॅकमधील फ्रिज, गिझर, मिक्सरसह अनेक विद्युत उपकरणे निकामी झाली. ‘पाशा’ व ‘फूल मून’ शॅकची अंदाजे दोन लाख रुपयांची हानी झाली. हरमल किनार्‍यावर नांगरून ठेवलेल्या अनेक होड्या व मासळीची जाळी पाण्याच्या लाटांबरोबर वाहून जात असताना येथील मच्छीमारांनी जीव धोक्यात घालून ती पकडली. मात्र, अनेक जाळ्यांची हानी झाली, असे मच्छीमार सांतान फर्नांडिस यांनी सांगितले.

केरी-तेरेखोल येथील पर्यटन खात्याच्या एकूण सहाही शॅक्सची हानी झाली असून ‘स्टारलाईट’ शॅक अर्धेअधिक जमीनदोस्त होऊन साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला आहे. ‘आजोबा’ शॅकच्या काऊंटरसह समोरील पूर्ण भाग पाण्याखाली गेल्याने शॅक मालकाला अंदाजे अडीच लाखांच्या हानीला सामोरे जावे लागले आहे. तसेच अन्य चारही शॅकना प्रत्येकी दोन लाखांची  झळ पोहोचली असल्याचे शॅकमालक विलास आरोलकर यांनी सांगितले.  शॅक पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन लाख खर्च येणार असल्याचे आरोलकर म्हणाले. 

समुद्र लाटांचे खवळलेले पाणी वारंवार शॅकमध्ये घुसत असल्याने शॅक्समधील सर्व साहित्य हटवण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे शॅक मालक डेनियल डिसोझा म्हणाले. 

व्यावसायिक प्रमेश मयेकर यांनी सरकारच्या पर्यटन खात्याने शॅक मालकांकडून परवान्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करावे, अशी मागणी केली. हरमलचे सरपंच अनंत गडेकर, केरी-तेरेखोल सरपंच नमिता केरकर आदींनी पर्यटन खात्याचे मंत्री व मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी केली. 

भरपाई मूल्यांकनासाठी सक्षम अधिकारी नेमणार ः पर्यटनमंत्री

ओखी चक्रीवादळामुळे गोव्याच्या समुद्रकिनारपट्टीवर शॅक्स व इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मूल्यांकन करण्यासाठी सरकार सक्षम अधिकारी नेमणार आहे, असे पर्यटनमंत्री  मनोहर आजगावकर यांनी सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मालमत्तांच्या नुकसानीबाबत चर्चा केली असून शॅक्स व्यावसायिकांच्या हितासाठी आवश्यक ते सहकार्य  करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.  

‘शॅक्स व्यावसायिकांना नुकसानभरपाई द्यावी’

 माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र साटेलकर यांनीही नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन सरकारने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली.