Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Goa › ‘ओखी’चा गोव्याच्या किनार्‍यांना तडाखा

‘ओखी’चा गोव्याच्या किनार्‍यांना तडाखा

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:30AM

बुकमार्क करा

पेडणे  ः प्रतिनिधी 

तामिळनाडू, केरळमध्ये धडकलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा रविवारी सकाळी 9 वाजता पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी किनारी भागाला बसला. किनारी भागातील सरकारी जागेत शॅक रेस्टॉरंट घातले होते त्या सर्व शॅक्समध्ये पाणी घुसल्याने व्यावसायिक पुरते हैराण झाले. या आपत्तीमुळे सुमारे 50 लाखांहून अधिक हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

समुद्राची पातळी रविवारी सकाळी अचानक वाढून पाणी शॅक्समध्ये घुसले. यात लाकडी पलंग, खुर्च्या वाहून गेले. किनार्‍यावर उतरायला जागाच उरली नव्हती. सरकारी यंत्रणा मदतीला धावून आली नाही, त्यामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पर्यटक खोल्यांमध्ये राहणारे पर्यटक भयभीत होऊन बाहेर पडले नाहीत. अशाही परिस्थितीत जीवरक्षक मात्र  धोक्याचा इशारा देणारे लाल बावटे घेऊन  पर्यटकांना समुद्रात उतरण्यास मनाई करत होते. मात्र वाहून जाणारे सामान वाचवण्यासाठी व्यावसायिकांची धडपड किनारी भागात दिसून येत होती.

केरी भागातील विलास आरोलकर, समीर हरजी, अमर तळकर, सुजित कलंगुटकर, योगेश तळकर, बबन तळकर, हरमलमधील दशरथ कोचरेकर, गोडविन, संताना डिसोझा, जॉनी मोंतेरो, सुहास प्रभू आदींच्या  हरमल येथील आठ शॅक्सचे नुकसान किमान 10 लाख, केरीत किमान 7 लाख , मांद्रेत 10 लाख रुपये व मोरजीत अंदाजे 15 लाख रुपयांचे शॅक्स व्यावसायिकांचे नुकसान झाले.

यंदाच्या  पर्यटन हंगामात सरकारी जागेत पर्यटन खात्याने 35 हून जास्त शॅक्स उभारण्यास परवानगी दिली होती. त्यातील अधिकाधिक शॅक्समध्ये पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले.शिवाय नव्याने शॅक उभारताना पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. विजेवर चालणारी यंत्रे,  फ्रिज, वॉशिंग मशीन आदी उपकरणांत पाणी जाऊन ते निकामी झाले .

आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले की, किनारी भागात ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न  करणार आहोत. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्याशी चर्चा करून त्यांनाही नुकसानग्रस्त व्यावसायिकांना मदत मिळवून देण्यासाठी विनंती करणार आहे.