Fri, Mar 22, 2019 01:31
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › आता घरबसल्या होणार रोजगार विनिमय नोंदणी कार्ड

आता घरबसल्या होणार रोजगार विनिमय नोंदणी कार्ड

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:52AMमडगाव : प्रतिनिधी

कोणतीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी व नोंदणीचे कार्ड सक्तीचे आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी सर्वप्रथम रोजगार विनिमय केंद्रात जाऊन स्वतःची नोंदणी करून घेण्यावर भर देतात.रोजगार विनिमय केंद्राच्या कार्यालयात जाणे, रांगेत उभे राहून आपला क्रमांक येण्याची वाट पाहत थांबणे, दाखले अद्ययावत करण्यासाठी आणि रोजगार विनिमय कार्डाचे पुन्हा नूतनीकरण करण्यासाठी पुन्हा पुन्हा कार्यालयात हेलपाटे मारणे या सर्व कटकटींपासून गोव्यातील युवा वर्गाची सुटका होणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या रोजगार विनिमय नोंदणी कार्ड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार आयुक्त जयंत तारी यांनी दिली.

तारी म्हणाले, की आता काही दिवसांत नॅशनल करिअर सर्व्हिसच्या मॅन्युअल पद्धतीने दिल्या जाणार्‍या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे लोकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. बुधवारपासून रोजगार विनिमय केंद्रातील सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या जाणार आहेत. त्यासाठी मडगावच्या रोजगार विनिमय केंद्राबरोबर इतर कार्यालयातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी पणजीत नेण्यात आले आहे. 

अखिल भारतीय व्हेंब पोर्टलच्या माध्यमातून या सेवा हाताळल्या जाणार आहेत. त्यामुळे दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यातील कार्यालयात येण्याची आवश्यकता लोकांना भासणार नाही.लोकांना घरबसल्या नोकरीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. त्यात त्यांना एक एनसीएस कार्ड मिळणार आहे. ते कार्ड त्यांना सदर नोकरीसाठी वापरता येणार आहे. या कामासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ कार्यालयातून प्रशिक्षणासाठी नेण्यात आले आहे.

सध्या दक्षिण गोव्यातील वीस मतदारसंघासाठी एकमेव असलेल्या मडगावातील रोजगार विनिमय केंद्राची व्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तिघांच अधिकार्‍यावर आलेली आहे. त्यातील एक निरीक्षक निवृत्तीच्या वाटेवर आहे. सांगेपासून ते काणकोण आणि काणकोणपासून वास्कोपर्यंतची जबाबदारी मडगावच्या रोजगार विनिमय केंद्राच्या कार्यालयावर आहे.दहावी उत्तीर्ण होणारे प्रत्येक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी सक्तीचे असलेले रोजगार विनिमय कार्ड बनविण्यासाठी इथे येतात. पूर्वी नोंदणी झालेले आणि त्यानंतर पुढील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फार असते. 

दहावी नंतर बारावी, बारावीच्या नंतर पदवी त्यापुढे संगणक कोर्स अशा शिक्षणाचे दाखले रोजगार विनिमय केंद्राशी अद्ययावत करण्यासाठी युवा वर्गाची नेहमी या कार्यालयात गर्दी होत असते.काही दिवसांपूर्वी दोन सरकारी खात्यांनी नोकरीसाठी जाहिरात दिली होती. अर्ज करायचा दिवस जवळ आल्याने रोजगार विनिमय कार्ड मिळविण्यासाठी मडगावच्या कार्यालयात युवा युवतींची झुंबड उडाली होती. ही सुविधा ऑनलाईन झाल्यानंतर युवा वर्गाला घरबसल्या रोजगार विनिमय कार्ड प्राप्त होणार आहे.