Fri, Feb 28, 2020 16:23होमपेज › Goa › ‘बोंडला’त वाघाचे जोडपे आणा

‘बोंडला’त वाघाचे जोडपे आणा

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:05AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

बोंडला अभयारण्यात तातडीने वाघाचे जोडपे आणण्याची सूचना मुख्यमंत्री तथा वन व पर्यावरणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वनखात्याच्या अधिकार्‍यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

वनखात्याने मंगळूर येथील डॉ. शिवराम कारंथ जैविक पार्क आणि म्हैसूर प्राणी संग्रहालयाकडे वाघाचे जोडपे देण्याची मागणी केली आहे. या बदल्यात गोव्याने गव्याची अथवा हरणाची जोडी देण्याची तयारी दर्शवली आहे. वन खात्याने येत्या एप्रिल- मे महिन्यापर्यंत वाघाचे जोडपे मागवून घ्यावे, असा आदेश मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बोंडला येथील अभयारण्याचे एकेकाळी आकर्षण असलेल्या राणा-संध्या या वाघ-वाघिणीच्या जोडीचा एका वर्षभरात मृत्यू झाला होता. राणा या वाघाचा डिसेंबर- 2016 मध्ये तर जोडीदार संध्या हिचा यंदाच्या जुलैमध्ये मृत्यू झाला होता. ही जोडी 2009 साली विशाखापट्टणमच्या प्राणी संग्रहालयातून आणली होती. या जोडीला पाहण्यासाठीच मोठ्या संख्येने लोक अभयारण्यात येत होते. 

1.13 लाख लोकांची ‘बोंडला’ला  भेट 

या अभयारण्यात 2016-17 या कालावधीत 1.13 लाख लोकांनी भेट दिली आहे. त्यामध्ये 36 हजार विद्यार्थी, 74 हजार भारतीय आणि 1912 विदेशी पर्यटकांचा समावेश असल्याचे अभयारण्याच्या सूत्रांनी सांगितले.