Sat, Feb 16, 2019 12:48होमपेज › Goa › मासळी आयातीचा तपशीलच खात्याकडे नाही : पालयेकर 

मासळी आयातीचा तपशीलच खात्याकडे नाही : पालयेकर 

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 1:11AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील जनतेकडून किती मासळी खाण्यासाठी वापरली जाते, अथवा परराज्यांतून होणार्‍या मासळी आयातीचा कोणताही तपशील खात्याकडे नसल्याचे मत्स्योद्योग खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री पालयेकर यांनी म्हटले आहे की, मासळी आणि अन्य संबंधित खाद्यपदार्थांचे दर नियंत्रणाखाली आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. राज्यातील घरगुती, व्यावसायिक हॉटेल्समध्ये मासळी किती खरेदी केली जाते, तसेच अन्य राज्यांत निर्यातीचा आकडाही खात्याकडे उपलब्ध नाही. 

याशिवाय, राज्याबाहेरून केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यांतून किती मासळी आयात केली जाते, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सदर उत्तरात नमूद करण्यात आले आहे. 

मात्र, राज्यातच किती मासळीचे उत्पादन होते याची माहिती राज्यातील पाच जेटींवर नोंद केली जाते. मागील तीन वर्षांचा हिशेब सादर करताना, 2015 साली एकूण 93,337 टन, 2016 साली 74,753 टन आणि 2017 साली 1 लाख 20 हजार 430 टन मासळी जेटीवर आणण्यात आली, असे मत्स्योद्योग मंत्र्यांनी उत्तरात नमूद केले आहे.