Wed, Mar 27, 2019 04:27होमपेज › Goa › ‘निपाह’ विषाणूची गोव्यात भीती नाही 

‘निपाह’ विषाणूची गोव्यात भीती नाही 

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 23 2018 12:51AMपणजी : प्रतिनिधी

केरळमधील कोझीकोडी  जिल्ह्यात पसरलेल्या ‘निपाह’ या घातक विषाणूचा धोका गोव्याला पोहचू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याकडून दक्षता घेण्यात येत असून परिस्थितीवर नजर ठेवण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत कुठलाही  खबरदारीचा इशारा जारी करण्यात आला नसल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली. 

राज्यातील जनतेने ‘निपाह’ बाबत घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले  आहे. 

दरम्यान, केरळहून गोव्यात येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याबाबतही कुठलेच निर्देश अद्याप आरोग्य खात्यानेजारी केलेले नाहीत.  सदर विषाणू केवळ केरळातील एकाच जिल्ह्यात असल्याने गोव्यातही तो पसरेल, अशी भीती बाळगणे अयोग्य आहे. मात्र खात्याकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

केरळमधील कोझीकोडी  जिल्ह्यात पसरलेल्या ‘निपाह’ मुळे आतापर्यंत  10  जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 12 जण निपाह बाधित असल्याचे आढळून आले आहे तर दोघांची प्रकृती  गंभीर  आहे. ‘निपाह’ हा विषाणू वटवाघुळांमुळे पसरत असल्याचे म्हटले जात आहे.