Fri, Apr 19, 2019 12:16होमपेज › Goa › राज्यात ‘निपाह’चा संशयित रुग्ण

राज्यात ‘निपाह’चा संशयित रुग्ण

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:29PMपणजी : प्रतिनिधी

‘निपाह’ चा  पहिला संशयित रुग्ण  सोमवारी राज्यात  सापडला. सदर रुग्ण गोमंतकीय असून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ)  त्याला दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचे रक्ताचे नमुने पुणेस्थित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून 48 तासांत अहवाल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

सदर इसम निपाह विषाणूची लागण झालेलाच रुग्ण असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेले नाही. पण त्याच्याविषयी संशय असल्याने त्याला चाचणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंबंधी  आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेने आला होता. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णाने भेट दिली नसली तरी निपाहच्या लागणीची काही लक्षणे आढळल्याने त्याने गोमेकॉत तपासणीसाठी भरती होणे पसंत केले. सध्या तरी यात चिंता करण्यासारखे काही नाही. गोमेकॉ इस्पितळात डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णाला ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण गोमंतकीयच असून त्याच्या रक्‍ताचे नमुने पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलाजी’  या प्रयोगशाळेत पुढील चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. निपाह विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणे आढळल्याने संभाव्य धोका टाळण्याच्या हेतूने आम्ही त्याला देखरेखीखाली ठेवले आहे.  पुणे येथून चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 

गोमेकॉच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला  असून केरळहून रेल्वेमार्गे गोव्यात दाखल झालेल्या ‘त्या’ तरुणामध्ये तापाची लक्षणे आढळल्याने त्याला  प्रथम आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, ‘निपाह’ची शक्यता आणि धोका लक्षात घेऊन त्याला गोमेकॉत हालवण्यात आले आहे. गोमेकॉच्या एका स्वतंत्र विभागात त्याच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. पुणे येथे पाठवण्यात आलेल्या त्याच्या रक्‍ताच्या नमुन्याचा अहवाल येत्या 48 तासांत मिळण्याची शक्यता आहे. रुग्णाच्या परिस्थितीवर ज्येष्ठ तसेच तज्ज्ञ डॉक्टर नजर ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सदर रुग्णाला राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांनुसार पुरेपूर संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने गोव्याला ‘निपाह’ संबंधी अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच पाठवली आहेत.  राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये ही मार्गदर्शक तत्त्वे पाठवली असून निपाहचा संशयित रुग्ण आढळल्यास गोमेकॉ इस्पितळास त्याबाबतची माहिती द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या लागण व लक्षणांबाबतही आरोग्य खात्याने जनजागृती अभियान सुरू केले आहे. 

केरळमध्ये सहलीसाठी गेलेल्यांमध्ये भीती  

केरळमध्ये काही भागात निपाह विषाणूने थैमान घातले असून सुमारे 13 जणांचा बळी गेला आहे. राज्यात उष्मा वाढला असल्याने आणि उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने केरळमधील थंड  ठिकाणी शेकडो गोमंतकीय कुटुंबे सुट्टी घालविण्यासाठी गेली आहेत. त्यापैकी कुणाला ‘निपाह’ची लागण झाल्याचे अजून सिद्ध झालेले नाही. मात्र आता प्रथमच संशयित रुग्ण आढळल्याने गोवा प्रशासनही सतर्क झाले असून केरळमध्ये सहलीसाठी गेलेल्या कुटूंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सूत्रांनी सांगितले.