Mon, Jun 17, 2019 02:45होमपेज › Goa › ‘10 वीच्या फेअरवेल’साठी नववीचे विद्यार्थी वेठीला

‘10 वीच्या फेअरवेल’साठी नववीचे विद्यार्थी वेठीला

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 15 2018 11:53PMमडगाव : प्रतिनिधी

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी नववीच्या  विद्याथ्यार्ंकडून दोनशे रुपये आकारले जात असून अन्य शुल्कांच्या नावे हजारो रुपये उकळण्याचा प्रकार कुडचडेतील एका शिक्षण संस्थेत सुरू आहे. शुल्क आकारणीबाबतची पावती देण्यास शाळेच्या कर्मचार्‍याने नकार दिल्याने  हा प्रकार उघडकीस आला. सध्या कुडचडे भागात विद्यार्थ्यांच्या लुटीचा विषय चर्चेचा  बनलेला आहे.  विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारे देणगी स्वीकारू नये,असे शिक्षण खात्याने शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच सर्व शाळा व्यवस्थापनांना कळवले  होते, तरीही   काही अनुदानित शैक्षणिक संस्थांनी विविध शुल्कांच्या नावावर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळणे सुरूच ठेवले आहे.या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

विद्याथ्यार्ंकडून प्रवेशावेळी देणगी घेतल्याचे निष्पन्न झाल्यास संस्थेचा दाखला रद्द केला जाईल,असा ताकीदवजा  इशाराही शिक्षण खात्याने दिला होता.शिक्षण खात्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे यंदातरी देणगी घेतली जाणार नाही,अशी आशा पालकांनी बाळगली होती,पण काही शिक्षण संस्थांनी विविध शुल्कांच्या नावावर पैसे उकळण्याची नवी  शक्कल  लढवली आहे.प्रत्येक विद्यार्थ्याकडून दोन ते अडीच हजार रुपये प्रवेश प्रक्रियेवेळी वसूल केले जात आहेत.पालकांना या शुल्कांची पावती देण्यास शैक्षणिक संस्था नकार देऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस  आला आहे.

कुडचडेतील प्रकाराप्रमाणे मडगावातीलही एका शाळेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून पालक शिक्षक संघासाठी दीडशे रुपये,स्कूल डायरी साठी सत्तर रुपये,फिल्ड ट्रीप साठी दीडशे रुपये,एनरॉलमेंट पन्नास रुपये,परीक्षा शुल्क शंभर रुपये,टर्म शुल्क एकशे तीस रुपये,विद्यार्थी निधी दीडशे रुपये,दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभासाठी शंभर रुपये आणि इतर खर्च म्हणून पंचेचाळीस रुपये आकारले जात आहेत. तर दहावीच्या प्रवेशासाठी वरील शुल्का बरोबर करिअर मार्गदर्शन शुल्क म्हणून साडे तीनशे रुपये,री ट्रीटच्या नावाखाली  तीनशे रुपये आणि दहावी इयत्तेचे शुल्क म्हणून दोनशे रुपये आकारले जात आहेत.प्रवेश शुल्काबरोबर विद्यार्थ्यांकडून हे सर्व पैसे भरून घेण्यात आलेले आहेत. काही पालकांच्या मनात याबाबतीत शंका उत्पन्न झाल्याने त्यांनी शिक्षण संस्थेकडे पावतीची मागणी केली.पण संस्थेने पावती देण्यास टाळाटाळ सुरू केली.पालकांनी याविषयी शिक्षण खात्याकडे तक्रार करण्याचे ठरवले आहे.

महेंद्र अल्वारिस यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले,की सदर शिक्षण संस्था  अनुदानित असल्याने आपण या शुल्काविषयी जाणून घेण्याकरिता माहिती हक्क कायद्याच्या अंतर्गत एका शाळेत अर्ज केला होता.पण त्याचे उत्तर अद्याप  मिळालेले नाही. तक्रार केल्यास आपल्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो, यासाठी पालक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.शिक्षण खात्याने या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करावी,अशी मागणीही अल्वारीस यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या लुटीची चौकशी व्हावी : अल्वारिस

दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या फेअरवेल पार्टीचा खर्च इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून घेतला जातो, असा प्रकार समोर आला आहे.प्रत्येक नववीच्या विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शाळा व्यवस्थापन  वसूल करत आहे.दहावीच्या मुलांना निरोप देण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकार कुडचडे भागात चर्चेला आला आहे.या प्रकाराची चौकशी करावी तसेच दहावी च्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ‘एसएससी काँट्रीब्युशन’च्या नावाखाली दोनशे रुपये घेतले जातात या प्रकाराची देखील चौकशी करावी,अशी मागणी अल्वारिस यांनी केली आहे.