Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Goa › बागा येथे पुण्याच्या नऊ पर्यटकांना अटक  

बागा येथे पुण्याच्या नऊ पर्यटकांना अटक  

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 31 2018 12:20AMम्हापसा : प्रतिनिधी 

बागा- कळंगुट येथे समुद्र किनारी पुण्याच्या अकरा पर्यटकांनी एका अल्पवयीन मुलीची छायाचित्रे काढून तिच्या अल्पवयीन भावाला मारहाण केली. याप्रकरणी संबंधित मुलीच्या आईने त्या पर्यटकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, कळंगुट पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पुण्याच्या नऊ जणांना अटक केली. दरम्यान, दोन अल्पवयीन संशयितांची मेरशीतील बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये रमेश कांबळे, संकेत भदाले, कृष्णा पाटील, सत्यम लंबे, अनिकेत गुरव, ऋषिकेश गुरव, आकाश सुवासकर, सनी मोरे, ईश्‍वर पंगारे (सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे.

बागा समुद्रकिनारी एका रेस्टॉरंटच्या बाजूला फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी व मुलगा खेळत होते. या खेळणार्‍या मुलीची छायाचित्रे संशयितांनी काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार त्या मुलीच्या भावाच्या निदर्शनास आला असता तो संशयितांना जाब विचारण्यास गेला. तेव्हा पुण्याच्या 11 संशयितांनी त्यास मारहाण केली. त्यानंतर पोलिस तेथे दाखल होण्याआधीच संशयितांनी तेथून पोबारा केला. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या   तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता गोवा सोडण्याच्या तयारीत असलेले संशयित बागा येथेच सापडले.   सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह सदर अल्पवयीन युवतीची जबाब  नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक करीत आहेत.      

कॅमेरा हस्तगत

पोलिसांनी 9 संशयितांविरूध्द  भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 323 व 354 कलमान्वये गुन्हा नोंदवून त्यांना  अटक केली.    पोलिसांनी संशयितांकडून छायाचित्रे काढलेला कॅमेरा हस्तगत केला आहे.