Wed, Aug 21, 2019 15:18होमपेज › Goa › ‘गोमेकॉ’त नवजात अर्भक तपासणी 

‘गोमेकॉ’त नवजात अर्भक तपासणी 

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:40PMपणजी : प्रतिनिधी

बालमृत्यू रोखून नवजात अर्भकांचा जीव वाचविणे ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी दर्जेदार आरोग्य सुविधा  पुरवण्याबाबत  राज्य सरकार गंभीर आहे. नवजात अर्भक तपासणी केंद्राचा उपक्रम राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असून अन्य राज्येही या उपक्रमाचा   अवलंब करतील, असा विश्‍वास आरोग्यमंत्री  विश्‍वजित राणे यांनी व्यक्‍त केला.

बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ), आरोग्य सेवा संचालनालयाच्या संयुक्‍त विद्यमाने सोमवारी नवजात अर्भक तपासणी केंद्राचा प्रारंभ आरोग्यमंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यावेळी राणे बोलत होते. 

राणे म्हणाले की, अर्भकांना जन्मताच 50 विविध प्रकारचे विकार होऊ शकतात. त्यांच्यावर त्वरित चाचणी व उपचार केल्यास त्यांच्यामधील हे रोग उपचारांद्वारे पूर्णपणे बरे करता येऊ शकतात. या सुविधेचा फायदा गोव्यातील लोकांना होणार असून त्यांनी आपल्या नवजात अर्भकांच्या हितासाठी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. अर्भकाचा जन्म खासगी इस्पितळात झाला तरी गोमेकॉत ही चाचणी मोफत करण्याची सोय करण्यात आली आहे. 

गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक, आरोग्य सेवा संचालक डॉ. संजीव दळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, बंगळूर येथील ‘न्यूओजन लॅब’चे सीईओ थॉमस मोक्केन यावेळी उपस्थित होते. बालरोग विभागाच्या  प्रमुख डॉ. मिमी सिल्वेरा यांनी  स्वागत केले.  डॉ. अर्पिता के. आर. यांनी सूत्रसंचालन केले. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना धुमे यांनी आभार मानले.