Fri, Jun 05, 2020 17:59होमपेज › Goa › उच्च न्यायालयाची नवी इमारत 31 मार्चपर्यंत पूर्ण

उच्च न्यायालयाची नवी इमारत 31 मार्चपर्यंत पूर्ण

Last Updated: Nov 08 2019 11:40PM

पर्वरी : पर्वरी येथील उच्च न्यायालयाच्या नियोजित इमारतीची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोबत अधिकारी वर्ग.पर्वरी ः वार्ताहर

येथील विधानसभा संकुलासमोरच्या टेकडीवर आकार घेत असलेेल्या नियोजित उच्च न्यायालयाच्या इमारतीचे जवळजवळ 80 टक्के काम पूर्ण झाले असून,  31 मार्च 2020 पर्यंत ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर एप्रिलच्या मध्यावर या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  जून 2020 पासून उच्च न्यायालयाचे कामकाज या इमारतीतूनच सुरु होणार असल्याची माहिती गुरूवारी या इमारतीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. पाहणीवेळी  मुख्यमंत्र्यांसमवेत गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे संचालक श्रीनेत कोठावळे, दिलीप जोशी, सुदेश साळगावकर, निता गोपी, एम. वेंकट राव इंफ्रा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद राव, मिस गायले हेन्रिक उपस्थित होते.

या इमारतीसाठी एलकेएस प्रा.लिमिटेडचे गायले हेन्रिक ही प्रमुख सल्लागार कंपनी आहे. तसेच एम.वेंकट राव इंफ्रा प्रोजेक्टचे प्रसाद राव हे प्रमुख कंत्राटदार आहेत. या इमारतीच्या कामाची तीन भागात विभागणी केली असून पहिल्या भागात वीज आणि सिव्हील कामाचा अंतर्भाव आहे. त्याचे जवळजवळ 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

उच्च न्यायालयाची एक समितीही या कामाची देखरेख करीत आहे.गेल्या महिन्यात मुख्य न्यायाधीश येथे येऊन या इमारतीची पाहणी करून गेला आहे. ही इमारत पूर्ण करण्यास थोडा जास्त कालावधी लागला आहे.पण आता काम जोरात सुरु असून जून 2020 पर्यंत उच्च न्यायालयाचे काम इथूनच सुरु होणार असल्याची खात्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलून दाखविली.

विविध आधुनिक सोयीनीयुक्त, अनेक खोल्या, न्यायाधीशांना अनेक चेंबर्स, रजिस्ट्रार व इतर अधिकार्‍यांना स्वतंत्र चेंबर्स, मोठा कोर्ट हॉल, व्हीडीओ कॉन्फरसिंग सभागृह, न्याय विभाग अशा अनेक सोयी या इमारतीत आहेत. ग्रीन प्रमाणपत्र मिळावे म्हणून गोवा साधन सुविधा महामंडळाचा  प्रयत्न आहे. या इमारतीच्या तळघरात प्रशस्त अशी चार चाकी आणि दुचाकीसाठी पार्किंगची सोय केली आहे, अशी माहिती येथील अधिकार्‍यांनी दिली.

‘बांधकामासाठी 90 कोटी खर्च अपेक्षित’
उच्च न्यायालय इमारतीच्या  बांधकामातील दुसर्‍या भागात अंतर्गत सजावटीचा समावेश असून याचे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे.शेवटचा भाग इमारतीच्या बाहेरील काम ते येत्या पंधरा दिवसात निविदा काढून लवकरच सुरु करण्यात येणार आहे.त्यात प्रामुख्याने न्यायालयात येण्या जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता तसेच स्थानिक रहिवाशासाठी अन्य रस्ता तसेच न्यायालयाच्या आवारातील सुशोभीकरण व अन्य कामाचा समावेश आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे एकूण 90  कोटी खर्च येणार आहे,अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी दिली.