Mon, Apr 22, 2019 22:10होमपेज › Goa › राज्यात लवकरच नवे 10 जलशुद्धीकरण प्रकल्प

राज्यात लवकरच नवे 10 जलशुद्धीकरण प्रकल्प

Published On: Aug 28 2018 1:25AM | Last Updated: Aug 28 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

सरकारने 2012 सालापासून केलेल्या विविध प्रयत्नांमुळे शुद्ध पाण्याची होणारी गळती 40 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणण्यात यश आल्याचे सांगून राज्यात सुमारे 700 कोटी रुपये खर्चून 10 ते 12 नवे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पर्वरीतील सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जलशुद्धीकरण प्रकल्पांपैकी काहींचे काम  सुरू असून, काही प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ढवळीकर म्हणाले, प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याच्या गळतीमुळे सरकारला दररोज 21 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागते. प्रक्रियायुक्‍त शुद्ध पाण्याची गळती रोखण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. यात सरकारला यश आले असून पाण्याची गळती 15 टक्क्यांवर  आणण्याचे ध्येय सरकारने  ठेवले आहे. यासाठी जनतेनेदेखील शुध्द पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून शुध्दीकरण केलेले पाणी वाजवी दरात जनतेला उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचेही  त्यांनी सांगितले.

कच्च्या पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रियेसाठी प्रती क्युबीक मीटर पाण्यासाठी 12 रुपये इतका खर्च येतोे. मात्र सरकार जनतेला हे पाणी अडीच रुपये प्रती क्युबीक मीटर या दरात उपलब्ध करतेे. या प्रक्रियेत सरकार जवळपास 9.50 रुपये नुकसान सोसते.   पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मीटर बसवले जाणार असून त्याद्वारे पाणी   गळती टप्प्याटप्प्याने कमी करण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी  सांगितले.

सरकारकडून उभारण्यात येणार्‍या नव्या जलशुध्दिकरण प्रकल्पांमध्ये   तिसवाडी तालुक्यासाठी 27 एमएलडीचा प्रकल्प  ओपा येथे उभारला जात असून तो जानेवारी 2019 मध्ये पूर्ण होईल. नेत्रावळी,  सांगे,  काले,  ओपा, गांजे, चांदेल, तुये, दाबोस, अस्नोडा आदी जलशुध्दीकरण प्रकल्पांतील जुने पंप बदलून नवे जादा अश्‍वशक्तीचे पंप बसवण्यात येतील. जायका प्रकल्पाचे काम  2019 पर्यंत  पूर्ण होणार असल्याचे  ढवळीकर यांनी सांगितले.