होमपेज › Goa › नेदरलँडचे कॉन्सूल जनरल गिडो तेलमन गोवा दौर्‍यावर

नेदरलँडचे कॉन्सूल जनरल गिडो तेलमन गोवा दौर्‍यावर

Published On: Feb 27 2018 12:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:36AMपणजी : प्रतिनिधी

नेदरलँडचे कॉन्सूल जनरल गिडो तेलमन  गोवा दौर्‍यावर आले असून  नेदरलँड व गोवा(भारत) दरम्यान  पर्यटन तसेच क्रीडा या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात त्यांनी पर्यटनमंत्री  मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर  यांच्याशी नुकतीच चर्चा केली. 

पर्यटनदृष्ट्या समद्ध असलेल्या गोव्याकडे नेदरलँडचे पर्यटक मोठया संख्येने आकर्षित होतील, असा विश्‍वास यावेळी तेलमन यांनी व्यक्त केला.

तेलमन म्हणाले,  गोवा नेदरलँड दरम्यान चार्टर विमान सेवा सुरू करण्यासाठी आपण  प्रयत्न करू.यासाठी   नेदरलँडच्या ट्रॅव्हल एजंटस्ना गोवा पर्यटन खात्याशी संपर्क वाढवण्याची विनंती केली जाईल. 

गोव्यातील  फुटबॉलपटू उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.  नेदरलँडकडून    विशेषतः महिला फुटबॉलपटूंना  पूर्ण पाठिंबा तसेच  प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी  प्रशिक्षणासह दोन्ही संघांमध्ये  प्रदर्शनीय सामनेही आयोजित केले जातील. गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी  नेदरलँडला  भेट देऊन  तेथील पर्यटनाचा अनुभव घ्यावा ,   असे आवाहनही  त्यांनी केले.
 पर्यटन मंत्री आजगावकर म्हणाले, नेदरलँडने गोव्याला पसंतीचे पर्यटनस्थळ  या दृष्टीने   प्रमोट करावे.  त्याचबरोबर गोवेकरांनी देखील नेदरलँडला  पर्यटनासाठी भेट द्यावी, यासंदर्भात आवश्यक  पावले उचलण्यात येतील.

 तेलमन यांनी   गोव्यातील काही समुद्र किनारे, मंदिरे तसेच   पर्यटनस्थळांना भेट देऊन  गोव्याच्या  पारंपरिक  जेवणाचा आनंद लुटला.   त्यांना गोवा पर्यटनाची पुस्तिका   पर्यटन मंत्री आजगावकर यांनी भेट म्हणून दिली. यावेळी पर्यटन संचालक   मिनीनो डिसोझा तसेच कॉन्सुल सहाय्यक आग्नेल गुदिन्हो उपस्थित होते.