Thu, Apr 25, 2019 21:51होमपेज › Goa › धोकादायक आस्थापने अन् सुरक्षेविषयी निष्काळजीपणा

धोकादायक आस्थापने अन् सुरक्षेविषयी निष्काळजीपणा

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:10AM

बुकमार्क करा
राज्यातील महत्त्वाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये मडगाव गांधी आणि न्यू मार्केटचा समावेश होतो. शहरात शेकडो घरे, हौसिंग सोसायटी(फ्लॅट्स), खासगी आणि सरकारी कार्यालये आहेत. रोज बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा हातभार लागतो. मात्र, याच्या सुरक्षेकडे अजून सरकार, मडगाव नगरपालिकेचे लक्ष नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील जनजीवन धोक्यात आहे. मागील वर्षी शहरातील अनेक आस्थापनाला आग लागून कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती. पुन्हा अग्‍नितांडवाचा धोका मडगाववासीयांना सतावत आहे. धोकादायक आस्थापनाचा शोध घेत दुर्घटनेपूर्वी संबंधितांनी उपाययोजना करावी, अशी मागणी बिगर सरकारी संघटना व नागरिकांतून होत आहे.

मुंबई लोअर परेल येथील पब ट्रेंड हाऊस या तळापासून चार मजली इमारतीच्या टेरेसवरील मोजोस ब्रिस्ट रेस्टॉरंटमधील पबमध्ये 30 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीने संपूर्ण देश हळहळला. त्या आगीत 14 जणांनी प्राण गमावला तर 60 पेक्षा अधिक जखमी झाले. अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. त्याप्रमाणे मडगाव शहरात अशी समस्या कधीही होण्याची शक्यता आहे.  गांधी मार्केट  व न्यू मार्केट या दोन्ही बाजारपेठेमध्ये आग विझविण्यासाठी बसविण्यात आलेल्या  पाण्याच्या हायड्रन्टवर विक्रेत्यांनी बस्ताने मांडलेली आहेत. गेल्या वीस वर्षांपासून पाण्याच्या टाकीचा व फायर हायड्रंटचा प्रश्‍न सुटलेला नाही. 

 त्याप्रमाणे शहरात अनेक खासगी, सरकारी कार्यालये आहेत. शॉपिंग सेंटर, हॉटेल्स, रेस्ट्रॉरंट, जनरल स्टोअर, दवाखाने, औषधालय, मेडिकल,  कपड्याची दुकाने, इलेक्ट्रॉनिक आस्थापने इतर आस्थापनांच्या मोठमोठ्या इमारतीत आहेत.

मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सौजा यांनी सांगितले, की शहरात अशी अनेक घरे आणि आस्थापने आहेत. जी अग्निशमन दलाच्या ना हरकत दाखल्याविना चालत आहे. सासष्टीत अचानक आग लागण्याचे अनेक प्रकार घडतात. केवळ डिसेंबर महिन्यात सासष्टी तालुक्यात 7 ठिकाणी लहान मोठ्या आगीच्या घटना घडल्या. त्यात सुमारे 22,07,000 रुपयांची हानी झाली.  मडगाव अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना सुमारे 1,29,14,000 रुपये वाचविण्यास यश आले आहे.

22 डिसेंबरला मडगावच्या ग्रेसिएस प्रस्तुती रुग्णालयात इलेक्ट्रीक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. इस्पितळात डॉक्टरांच्यासह रुग्ण व इस्पितळातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. त्यात इस्पितळाचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. 26 डिसेंबर रोजी मडगावच्या घोगळ सर्कलजवळील कुरतरकर लॅन्डमार्क इमारतीतील बॉब बार अँड रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत ते जळून राख झाले. रेस्टॉरंटच्या स्वयंपाक गृहात तीन एलपीजी सिलिंडरला पेट घेतल्याने ही आग लागल्याची शक्यता  मडगाव अग्निशमन दलाने व्यक्त केली होती.  त्यात  15-18 लाखांचे रुपयांचे नुकसान झाले होते. रेस्टॉरंटच्या इमारतीत शेकडो लोक राहतात. आग लागली त्यावेळी ते घटनास्थळी  होते.  बॉब रेस्ट्रॉरंटची आग विजवताना सुमारे दोन ते अडीच तास लागले. मात्र, दोनही दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या इमारतीला आग लागल्याने लाखो रुपयांची हानी झाली. मात्र, पुन्हा ही  घडू नये त्यासाठी येथील रहिवाशांनी रेस्टॉरंटचा व्यापार परवाना रद्द करण्याची मागणी उपनगराध्यक्ष टिटो कार्दोस यांच्याकडे केली आहे. 

मार्केटमध्ये अनेक अडचणी

अग्निशमन दलाच्या कार्यालयातून असे सांगण्यात आले, की पूर्वी आग लागण्याची एखादी घटना घडल्यास अग्निशमनदलाचा पाण्याचा बंब आत बाजारापर्यंत येऊ शकत होता. पण आता दोन्ही बाजाराच्या अतिक्रमणात वाढ झालेली आहे. जुने रेल्वे स्थानक आणि पेड परिसरापर्यंत वाढलेल्या अतिक्रमणामुळे अग्निशमनदलाचा बंब आत येऊ शकत नाही. 

हायड्रंटसाठी घालण्यात आलेली जलवाहिनी जुनी आणि कमी क्षमतेची आहे. त्यामुळे हायड्रंटला पाण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे ते बंद अवस्थेत आहेत. मार्केटपासून अग्निशमन दलाचे कार्यालय अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. पण हेच अंतर कापण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाऊण तास लागतो. कोणतीही दुर्घटना घडल्यास हा बंब पोहेचे पर्यंत मोठे नुकसान होते.

ग्राहकांनी काळजी घ्यावी : वीजमंत्री पांडुरंग मडकईकर 

अनेकजण वीज खात्याच्या परवानगी शिवाय अंडर गेज वीज तारा वापरतात. त्यावर जास्तप्रमाणात जोडणी देऊन उपकरणांचा बोजा वाढवतात. उत्तम दर्जाची फ्लेक्सिबल वायर न वापरल्याने किंवा एखादी जोडणी खुली सोडल्यास शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. यात वीज खात्याची काहीही चूक नसून वीज खाते केवळ मीटर बॉक्स बसविण्या इतपत आपले काम पूर्ण करते. त्यापुळे ती वीज काशी व किती प्रमाणात वापरावी हे सर्व त्या व्यक्तींवर अवलंबून असते. वीज तारांवर अपेक्षेपेक्षा जास्त जोडणीचा भार दिल्यास शॉर्ट सर्किट होते. त्यानंतर आग लागल्यानंतर वीज खाते निमित्त मात्र बनते. वीज पुरवठ्यात वा जोडणीत चूक सापडल्या त्याची वीज खात्याकडून दखल घेतली जाईल.  ग्राहकांची तक्रार स्वीकारण्यास किंवा दखल घेण्यास वीज कर्मचार्‍यांनी किंवा अधिकार्‍यांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.  ग्राहकांनी गंभीर तक्रारीची नोंद वीज खात्याच्या तात्काळ संपर्क कार्यालयात नोंद करावी. येथे ग्राहकांच्या तक्रारींवर योग्य दाखल घेतली जाईल. एम.आर.पी. विभाग मडगावात आहे.  ट्रान्स्फॉर्माची तपासणी, वीज पुरवठ्याबद्दल तपासणी व इतर तपासणी नियमित स्वरूपात केली जाते. एम.आर.पी. विभागाची सेवा 24 तास उपलब्ध असते.

मुंबई येथे झालेली भीषण दुर्घटना एका रात्रीत सर्वनाश करून गेली.  आगीपेक्षा आगीमुळे झालेल्या धुरात घुसमटून अनेकांचा जीव गेला. मोजोस ब्रिस्टो या रेस्टॉरंटच्या पबमध्ये झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्य झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. 

त्यानंतर अनेक महिन्यांपासून असलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. मडगावातही अशीच परिस्थिती आहे. मडगावचे मार्केट जीव मुठीत धरून वावरत आहे. फ्लॅट, हौसिंग सोसायटी, चाळ, सारख्या ठिकाणी किचकटीचे स्वरूप आहे. दुर्घटना होण्यापूर्वी यावर उपाययोजना करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. 23 डिसेंबर रोजी असोल्डा येथे झालेल्या एलपीजी सिलिंडर स्फोटामुळे एक दांपत्य दगावले. मुंबई सारखी परिस्थिती आज मडगाव शहरातही आहे. प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये ए.सी. असल्याने हवाबंद खोल्या आहेत. ज्या धोकादायक स्थितीला आहेत.  सुरक्षिततेबद्दल प्रशासने पावले उचलली पाहिजेत, असे गोवा कॅ न फोरमचे निमंत्रक रोलांड मार्टीन्स यांनी सांगितले.