Tue, Jun 25, 2019 21:23होमपेज › Goa › दोनापावला जेटीवरील शिल्पाकृतींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

दोनापावला जेटीवरील शिल्पाकृतींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:45PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात येणार्‍या पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या दोनापावला जेटीवरील दोन शिल्पाकृती आणि टेकडीवरील ‘पेरगोला’ जर्जर अवस्थेत असून त्या कोसळण्याच्या स्थितीत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या या प्रसिद्ध जेटीची अवस्था बिकट झाली आहे. राजधानीत अनेक ठिकाणी नव्याने शिल्पाकृती बसवून सौंदर्यीकरण करत असलेल्या कला आणि संस्कृती खात्याने या जुन्या वारसा स्थळांवरील शिल्पाकृतीचे संवर्धन करावे, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ आणि संस्कृतीप्रेमींकडून होत आहे. 

पणजी शहराला भेट देणारे हजारो पर्यटक दोनापावला येथील जेटीवर जाऊन तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतात. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचे चित्रिकरणही याठिकाणी झालेले आहे. टेकडीवरील दोना-पावला या पुतळ्यांचे तसेच समुद्राचे विहंगम दृश्य चित्रपटांतून झळकले आहे. दोनापावला येथील जुनी जेटी मोडकळीस आली असून राज्य सरकारने ती पर्यटकांना धोकादायक असल्याचे जाहीर करून जेटीची नव्याने दुरूस्ती करण्याचे निश्‍चित केले आहे. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे अजूनही सदर दुरूस्तीकाम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले नाही. जेटीच्या शेजारील छोट्याशा टेकडीवर दोना-पावला या जगप्रसिद्ध जोडप्यांच्या शिल्पाकृतीची देखभाल केली जाते.

मात्र, याच दोनापावला पुतळ्यांच्या शेजारी असलेल्या दोन शिल्पाकृतींकडे प्रशासनाचे फारसे लक्ष जात नसल्याचे आढळून आले आहे. इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे यांनी यासंदर्भात  सांगितले की, रॉबर्ट नॉक्स या जोडप्याच्या स्मरणार्थ या दोन शिल्पाकृती जर्मन शिल्पकार येरसा व्हॉन लेस्टेनर यांनी साकारल्या  होत्या या शिल्पाकृतींचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी 1969 साली अनावरण केले होते. या दोन्ही शिल्पाकृतींना भेगा पडल्या असून त्या कधीही कोसळू शकतात. तसेच जेटीच्या बाजूला असलेल्या टेकडीवर 1936 साली उभारण्यात आलेल्या ‘पेरगोला’चीही बिकट अवस्था झाली असून  गेल्या 80 पेक्षा जास्त वर्षे  उन, वारा आणि पाऊस यांचा मारा सहन करत  ‘पेरगोला’ उभा आहे.या प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन या शिल्पाकृती तसेच ‘पेरगोला’ची दुरूस्ती   करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  संस्कृतीप्रेमी मेलानी परेरा म्हणाल्या की, या दोन्ही शिल्पाकृती अत्यंत सुंदर असल्या तरी सध्या त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातील एका शिल्पाकृतींचा तळ पूर्णपणे सुटला असून ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. 

Tags : Goa, Neglected, administration, statue, dona paula, jetty