Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › वाइनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक : पर्यटनमंत्री 

वाइनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक : पर्यटनमंत्री 

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 11:41PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील वाईन पेय बनविणार्‍यांनी वाईनवर अधिक अभ्यास करायला हवा. जांभूळ, काण्णा अशा अनेक फळांपासून वाईन बनविली जाते. महोत्सव हा मनोरंजनाबरोबरच अभ्यासाचा विषय असून वाईनवर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. वाईन म्हणजे फक्त पेयच नसून आपल्या पूर्वजांकडून वाईनचा वापर औषध म्हणून केला जात होता, असे मत पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी व्यक्‍त केले. 

गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी)तर्फे पणजी येथील डी. बी. बांदोडकर मैदानावर आयोजित ‘ग्रेप एक्सपेड’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आजगावकर बोलत होते. 

महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल उपस्थित होते. मंत्री आजगावकर यांच्या हस्ते  ‘ग्रेप एक्सपेड’ चे उद्घाटन झाले. मंत्री आजगावकर म्हणाले की, गोव्यातील वाईन ही महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या काजू महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. वेगवेगळ्या महोत्सवांतून गोव्याचे संगीत, खाद्यपदार्थ व पेय ही राज्याची संस्कृती राष्ट्रीय स्तरावर आपण पुढे घेऊन जात आहोत. गोव्याला पर्यटन क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. 

नीलेश काब्राल म्हणाले की, पुढच्या वर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल. महोत्सवाच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकारच्या वाईन चाखायला मिळते. यात आले, अननस, आंब्यापासून बनवलेल्या वाईनचा समावेश आहे. महोत्सवातून स्थानिक वाईन बनविणार्‍यांना व्यासपीठ मिळते. या महोत्सवातून संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

‘ग्रेप एक्सपेड’या चार दिवसीय महोत्सवात विविध पेय चाखण्याची संधी लोकांना मिळणार आहे. महोत्सवात गोव्याचे पारंपरिक अन्‍न, गोव्याच्या संस्कृतीची झलकही अनुभवण्यास मिळणार आहे. महोत्सवात खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स् उभारले आहेत. स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची मोठी उपस्थिती महोत्सवाला लाभणार असून हा महोत्सव 22 एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.