Sun, Feb 23, 2020 11:31होमपेज › Goa › गोव्यात लवकरच ‘नाईलिट’चे केंद्र

गोव्यात लवकरच ‘नाईलिट’चे केंद्र

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

गोवा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांचे ‘हब’ बनू शकते, त्याद‍ृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. राज्यात लवकरच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘नाईलिट’चे केंद्र उघडणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान, विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. 

येथील आयनॉक्स थिएटरमध्ये केंद्रीय  मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते राज्याचे ‘माहिती-तंत्रज्ञान (आयटी) धोरण-2018’ जाहीर करण्यात आले.   व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राज्याचे माहिती-तंत्रज्ञान तथा महसूल खात्याचे मंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, मुख्य सचिव धर्मेश शर्मा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ‘डिजीटल इंडिया’ मोहिमेविषयी  दूरदृष्टी आहे. त्यामुळेच सामान्य भारतीयांचे माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण करण्याचे ध्येय समोर ठेवून ‘डिजीटल इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. आता आम्हाला डिजीटल क्रांतीची कास सोडून चालणार नाही. डिजीटल शासन हेच सुशासन आहे. डिजीटल सेवांमुळे तत्परतेने लाभ सर्वांपर्यंत पोहचवता येतात. भविष्यात भारत माहिती वर्गीकरणाचे (डेटा अ‍ॅनालिसीस) मोठे केंद्र बनणार असल्याचा विश्‍वास रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला. 

देशात उद्योजकतेचे वातावरण निर्माण होत आहे. ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची भरभराट होत आहे. भारत आज मोठी डिजीटल बाजारपेठ बनली आहे, त्यामुळे नामवंत जागतिक कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी येत आहेत. ‘स्टार्ट अप’ उद्योगांचेही प्रमाण वाढत आहे. मोबाईल निर्मिती करणार्‍या केवळ दोन कंपन्यांचे युनिट 2014 मध्ये आपल्या देशात होते, आता केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे मोबाईल निर्मिती करणार्‍या कंपन्यांची संख्या 120 वर पोहोचली आहे. विविध पोर्टलच्या माध्यमातून जून 2018 मध्ये 234 कोटी लोकांनी ई-व्यवहार केला आहे. तसेच स्री स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत 207 ‘सॅनिटरी पॅड’ निर्मिती केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात अतिशय कमी दरात सॅनिटरी पॅडस् उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले. 

या कार्यक्रमादरम्यान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन कंपन्या ‘वॉव सॉफ्ट’ आणि ‘विएस्टन’ यांनी राज्य सरकारसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. तसेच ‘इंटेल’ कंपनीच्या भारतातील प्रमुख निवृत्ती राय यांनी इंटेल कंपनी राज्याच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले. 

राज्यातील योजना ‘उमंग’ वर उपलब्ध करा’ 

राज्याच्या सर्व योजना केंद्र सरकारच्या ‘उमंग’अ‍ॅपवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. ते म्हणाले, राज्याचे माहिती-तंत्रज्ञान धोरण अतिशय योग्य पद्धतीने साकारले जात आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्याला आघाडीवर नेण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.