Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Goa › विर्डी धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली

विर्डी धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMडिचोली : प्रतिनिधी

महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून मोठ्या प्रमाणात मशिनरी व ट्रक आणलेले आहेत. याची माहिती मिळताच जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या  सूचनेवरून अभियंत्यांच्या पथकाने मंगळवारी धरण क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.  

या पाहणी पथकामध्ये अभियंते आर. वाय. बांदेकर, अभियंता मारियो, अभियंता मॅन्युएल यांचा समावेश होता. महाराष्ट्र सरकारने धरण क्षेत्राकडे जाणारा रस्ता दुरूस्त केला असून त्यामुळे विर्डी धरणाचे काम सुरू करण्यासाठीची तयारी असावी असे दिसते, असे अभियंते बांदेकर यांनी सांगितले. गोव्यावर नवे जलसंकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी विर्डी धरणाच्या उभारणीसाठी 146 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली होती.आता पावसाळा दोन महिन्यांवर असताना 2015 साली बंद झालेले काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने काम सुरू केले तर ते पूर्णतः बेकायदेशीर ठरेल, असे  वरिष्ठ अधिकारी संदीप नाडकर्णी यांनी सांगितले.

म्हादई जललवादासमोर म्हादईप्रश्‍नी सुनावणी पूर्ण होऊन निकाल अपेक्षित असताना महाराष्ट्राने 2015 पासून बंद ठेवलेले काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली केल्याने गोव्याला संकटाची चाहूल लागली आहे. म्हादई जललवादाच्या समितीने चार वर्षांपूर्वी विर्डी धरण क्षेत्राची पाहणी केली होती. त्यावेळी लवादाने महाराष्ट्राने नियम धाब्यावर बसवून काम चालवल्याचे स्पष्ट केले होते.