Fri, Mar 22, 2019 23:57होमपेज › Goa ›  पणजी पीडीएतून सांताक्रुझ वगळण्यासाठी आंदोलन

 पणजी पीडीएतून सांताक्रुझ वगळण्यासाठी आंदोलन

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी

सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ गाव वगळण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. राज्य विधानसभेच्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांची 18 रोजी संध्याकाळी 5 वाजता आंदोलनाची पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी सांताक्रुझ येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. 

पीडीएमध्ये समावेशाला विरोध असलेल्या स्थानिक राजकारण्यांनी नवीन पीडीएच्या संचालकपदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी सांताक्रुझ गाव विकास समितीचे आर्थुर डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला माजी आमदार व्हिक्टोरीया फर्नांडिस यांनी पाठींबा जाहीर केला आहे. विद्यमान आमदार ऍन्थोनी फर्नांडिस यांनी ग्रामस्थांना पाठिंबा  दिला  असून  सांताकुझ  गावाच्या समावेशाचा विषय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले आहे. सांताक्रुझ गाव पीडीएमधून वगळण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ग्रेटर पणजी पीडीएच्या मंडळावरील अध्यक्ष व 16 संचालकांमध्ये 11 राजकारणी आणि 4 व्यावसायिक, बिल्डरांचा समावेश आहे. या नवीन पीडीएमध्ये 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सांताक्रुझ व परिसरातील शेती, बागायती, डोंगर यांचा पीडीएमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीडीएमुळे गावातील पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पीडीएवर  एकाही  पर्यावरण तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असा आरोप गाव विकास समितीच्या समन्वयक एल्सा फर्नांडिस यांनी केला.

कालापूर सांताक्रूझ येथील शेती, खाजन शेती, डोंगर आदी भागाचा पीडीएमध्ये समावेश केला आहे. नगर नियोजन खात्याकडून नवीन प्रादेशिक आराखडा खुंटीला टांगून ठेवला आहे. याच खात्याकडून केवळ दोन महिन्यांत नवीन पीडीएची घाईघाईत स्थापना करण्यात आली आहे. नवीन पीडीए स्थापन करण्यासाठी एवढी घाई कशासाठी केली ? असा प्रश्‍न आर्थुर डिसोझा यांनी उपस्थित केला.

ग्रेटर पणजी पीडीएमध्ये सांताक्रुझच्या समावेशाला विरोध केला होता. ग्रामसभेत यासंबंधीचा ठरावसुध्दा संमत करण्यात आला आहे. पीडीएमध्ये समावेशाला विरोध असलेल्या स्थानिक राजकारण्यांनी नियुक्‍तीबाबत राजीनामे सादर करून नागरिकांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही डिसोझा यांनी सांगितले.

गावाचा पीडीएमध्ये समावेश झाल्यास पर्यावरणाला धोका संभवतो. या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे. गोंयकारपण सांभाळून ठेवण्याची भाषा करणार्‍यांनी गोवा विकण्याचे कारस्थान रचले आहे, असा आरोप माजी आमदार व्हिक्टोरीया फर्नांडिस यांनी केला. 

यावेळी अन्थोनी लॉरेन्स, पीटर गोन्साविस, रूडाल्फ फर्नांडिस, सुदेश कळंगुटकर यांची उपस्थिती होती.