होमपेज › Goa › कुजिरासाठी फेब्रुवारीत आणखी २० बसेस : मुख्यमंत्री

कुजिरासाठी फेब्रुवारीत आणखी २० बसेस : मुख्यमंत्री

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 30 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी

कुजिरा संकुल ते पणजी बसस्थानकापर्यंत नवीन 15 कदंब बसेस मंगळवार पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. कुजिरा संकुलासाठी सरकार एकुण 35 बसेस उपलब्ध करणर असून उर्वरीत 20 बसेस फेब्रुवारी महिन्यात सुरु केल्या जाणार असल्याची माहिती  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

बांबोळी येथील कुजिरा संकुलात नवीन कदंब बस सेवेला प्रारंभ करण्यासाठी  आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. कार्यक्रमाला कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा, उद्योजक श्रीनिवास धेंपे, इडीसीचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळयेकर तसेच  कुजिरा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, कुजिरा शैक्षणिक संकुलातील शाळांना अक्षय पात्र अंतर्गत एकत्रीतपणे माध्यान्ह आहार सुविधा पुरविण्यावर सरकार विचार विनियम करत आहे. येथील  शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना सर्व पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पाणी, वीज आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी सरकार सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करणार असून कुजिरात सार्वजनिक वाचनालय सुविधा आणि इनडोअर स्पोर्ट्स सुविधा उपलब्ध करण्याच्याही सरकारचा विचार आहे.

बांबोळीला कुजिरा येथे शैक्षणिक संकुलात सध्या सुमारे 8000 मुले या संकुलात शिक्षण घेत आहेत. येणार्‍या काळात अधिक शाळा संकुलात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन गोव्यात होणार असल्याने क्रीडा संचालनालय त्या कामात गुंतले आहे. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा झाल्यानंतर सार्वजनिक क्रीडा सुविधा सुरु करुन त्यात सर्व प्रकारचे खेळ उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. आवश्यकता असल्यास इलेक्टा्रॅनिक वाचनालय सुरु केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा हागणदारीमुक्त करणार 

गोव्याला 2 ऑक्टोबर पर्यंत हागणदारी मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात आजही 70 हजार घरे शौचालयाविना आहेत. राज्यातील 5 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून उरलेल्या 7 तालुक्यांमध्ये मार्च पर्यंत सर्वेक्षण पूर्ण होईल. शौचालये उभारण्यासाठी सरकारला सुमारे 300 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्यात स्वच्छतागृह नसणे अत्यंत लाजीवरवाणी गोष्ट आहे.
-मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री.