Tue, Feb 19, 2019 22:21होमपेज › Goa › मान्सून आज बरसणार

मान्सून आज बरसणार

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:53AMपणजी : प्रतिनिधी  

मान्सूनची सध्या संथ गतीने वाटचाल सुरू असून पुढील 24 तासात कोणत्याही क्षणी राज्यात मान्सून  दाखल होऊ शकतो. येत्या दोन दिवसांत काही ठिकाणी तर 9 व 10 जून रोजी राज्यभरात जोरदार वृष्टी होईल, असा अंदाज  गोवा वेधशाळेचे संचालक मोहन लाल साहू  यांनी व्यक्‍त केला आहे.   

मान्सून  अर्थात नैऋत्य मोसमी वारे सुरवातीला अंदामानपासून केरळ व नंतर कर्नाटकापर्यंत वेगाने सरकले होते. मात्र, सध्या दक्षिण  कर्नाटकात दाखल झालेल्या  मान्सूनची गती मंदावली आहे.  मान्सून संथ गतीने पुढे सरकत असून तो गोव्याच्या सीमेवर पोहोचला आहे. राज्यात 9 व 10 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे, असे साहू यांनी  सांगितले. अरबी समुद्रात काही प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण  झाल्याने मान्सूनची गती मंदावली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर 24 तास राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असून त्यानंतर राज्यभरात मान्सून सक्रिय होईल.

सध्या राज्यातील तापमानातही घट झाली असून कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान 24.8 अंश सेल्सियस इतके आहे. मान्सूनच्या आगमनानंतर  यात अधिक घट होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.  गतवर्षीच्या तुलनेत  यंदा गोव्यात चांगल्या प्रमाणात मान्सून  अपेक्षित आहे. गोव्यात दरवर्षी 2500 मिमी. पावसाची नोंद होते. गतवर्षी हे प्रमाण कमी होते. यंदा सरासरी 95 टक्के पावसाची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.